रायगडकरांनो, चिकन, अंडी खाताना घ्या 'ही' काळजी...

By Raigad Times    13-Jan-2021
Total Views |
रायगडकरांनो, चिकन, अंडी ख
 
'बर्ड फ्ल्यू'ची भीती बाळगू नका
कुक्कुटपालक, नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन
 
अलिबाग : पक्ष्यांमधील 'बर्ड फ्लू'ची योग्य ती माहिती समजून घेऊन त्याप्रमाणे काळजी घ्यावी, भीती बाळगू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के आणि जिल्हा पशु विकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी नागरिकांना केले आहे. तसेच चिकन, अंडी खाताना काय काळजी घ्यावी, याबाबतही सूचना केल्या आहेत.

Bird Flu _1  H  
 
पक्ष्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात मर्तृक आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना त्वरीत कळवावे. पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचा इतर जंगली पक्षाशी (उदा.बदके, कबूतर, पोपट, चिमण्या, कावळे इ.) संपर्क होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जैव सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करावी, कुक्कुटपालकांनी शेड व परिसरामध्ये स्वच्छता बाळगावी, नियमित सोडीयम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, चुना लावून परिसर निर्जंतुकीकरण करावा, संशयित-प्रादूर्भाव झालेल्या फार्मवरुन पक्ष्यांची वाहतूक, खरेदी विक्री थांबवावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Bird Flu 2_1  H 
 
चिकन व अंडी खाताना नागरिकांनी घ्यावी ही काळजी
 
चिकन व अंडी 100 अंश डिग्री सेल्सिअसवर शिजवूनच खावीत, चिकन स्वच्छ करताना हॅण्ड ग्लोजचा वापर करावा, समाजमाध्यमातून व इतर प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अफवांपासून सावध रहावे, मांस, अंडी व मासे चांगले शिजवून बिनधास्त खा व निरोगी रहा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.ahd.maharahstra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
हे करु नका ...

 • कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.
 • अर्धवट शिजलेले मांस/चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
 • आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.
 • पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका, असेही आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत या सूचना

 • पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा.
 •  पक्षी, कोंबड्याचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते, अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.
 • शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. 
 • एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करु नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा. 
 • कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा.
 • कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा.
 • पूर्ण शिजवलेले मांसच खा.
 • आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वन विभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.