गोसीखुर्द तसेच कोकणातील लोकोपयोगी प्रकल्पांना प्राधान्याने पुर्ण करा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

By Raigad Times    13-Jan-2021
Total Views |
 
udhav thKRE_1  
 
मुंबई :  लोकांना जास्तीत जास्त उपयोग होईल तसेच राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेला गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही तातडीने करावी. ज्या योगे स‍िंचनाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागेल असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज दिले.
 
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाठबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती अडीअडचणी व प्रकल्प पुर्ण करण्यासाठी असलेल्या उपाय यासंदर्भातील बैठकीचे आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले.
 
या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, खा. सुनिल तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव (जलसंपदा), विजयकुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे व इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थ‍ित होते.
 
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प संदर्भात पुर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडीअडणींबाबत निधी, पुनर्वसन संदर्भातील प्रश्नांची या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या ठिकाणचे असलेले प्रश्न मार्गी लावत असतानाच प्रकल्प पुर्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. गोसीखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन संदर्भातील काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अपर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे कोकणात सुरु असलेले प्रकल्प, मागील काळात त्यामध्ये आलेले अडथळे याबाबतही सविस्तर चर्चा झाली. त्या प्रकल्पांना पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत असेही श्री ठाकरे म्हणाले.
 
जलसंपदा मंत्री – जयंत पाटील
 
जलसंपदा विभागाअंतर्गत सुरु असलेल्या राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेवून त्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून ते पुर्ण करण्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्यामुळे येत्या तीन-चार वर्षात हे प्रकल्प पुर्ण होऊन राज्यातील ओलीत क्षेत्र वाढेल असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मानवतेच्या दृष्टीकोनातून प्राधान्याने पुर्ण करावा अशी सूचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.
 
यावेळी गोसीखुर्द राष्टीय प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई व कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री माटे यांनी संगणकीय सादरीकरण करुन येथील प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.