पेण नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अजय क्षीरसागर

By Raigad Times    13-Jan-2021
Total Views |
Pen Municipal Corporation
 
पेण (देवा पेरवी/प्रदीप मोकल) । माजीमंत्री तथा भाजपचे आमदार रविंद्र पाटील यांच्याशी निष्ठावंत राहिलेले अजय क्षिरसागर यांची पेण नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी तशी घोषणा केली.
 
माजी स्वीकृत नगरसेवक प्रशांत ओक यांनी 28 डिसेंबर 2020 रोजी राजीनामा हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवड करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्या 31 डिसेंबर 2020 च्या आदेशानुसार स्वीकृत नगरसेवक अर्ज भरणे आणि छाननी करणे याकामी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची नियुक्ती केली होती.
 
12 जानेवारी रोजी स्वीकृत नगरसेवकपदासाठी अजय सुरेश क्षीरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे आज (13 जानेवारी) सकाळी अकरा वाजता नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून अजय क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
 
या निवडीनंतर नगरपालिकेच्या समोर फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. तसेच अजय क्षीरसागर यांची पेण शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी प्रितम पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, गटनेते अनिरुद्ध पाटील, निवृत्ती पाटील आदी नगरसेवक उपस्थित होते.