स्वामी विवेकानंद. एक आदर्श व्यक्तिमत्त्व..!

By Raigad Times    12-Jan-2021
Total Views |
swami vivekananda_1 
 
स्वामी विवेकानंद विश्वविजय संपादन करून १८९७ साली भारतात परतल्यावर त्यांच्या पहिल्या वहिल्या भाषणात मद्रास (आताचे चेन्नई) येथील युवकांसाठी आवाहन केले होते.
 
’हे, भारतातील युवकांनो, आता उठा! जागे व्हा!!! आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका.
 
राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी स्वामीजींना ’विवेकानंद’ असे नाव दिले.स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
 
उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३,रोजी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) ऍटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता.
 
विवेकानंद हे मित्र परिवारात त्यांचे मित्र त्यांना ’बिले’ या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरू ’नोरेन’ या शब्दाने. वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.
 
स्वामी विवेकानंद या नावाने नामकरण:---
 
एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यास दीक्षा दिली. संन्यास ग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ.रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा.
 
एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, ‘नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, हे सारे माझ्याने होणार नाही. रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील. पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण ‘स्वामी विवेकानंद’ असे केले.
 
अमेरिकेतील शिकागो सर्वधर्मपरिषद:--
 
११सप्टेंबर, १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील ’शिकागो-आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला स्वामी विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणार्‍या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले.
 
जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन ’भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी’ असे केले. ’न्यूयॉर्क क्रिटिक’ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणार्‍या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत. वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापन केली.
 
भारताच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित:-
 
४ जुलै १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. २सप्टेंबर १९७०साली कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे