\
_1_H@@IGHT_582_W@@IDTH_700.jpg)
पोलादपूर पोलीसांना गस्तीदरम्यान आढळली दोन लहान मुलं
पोलादपूर (शैलेश पालकर) | पोलादपूर शहरात पहाटेच्या सुमारास दोन शाळकरी मुले संशयास्पदरित्या फिरताना आढळली त्यानंतर त्यांची आस्थापूर्वक माहिती घेता दोघेही महाबळेश्वर येथील एका हायस्कूलच्या कॅम्पसमधून निसटले असल्याचे आढळून आले. मात्र, पोलादपूर पोलीसांनी गस्तीदरम्यान आढलेली ही दोन्ही मुलं पुन्हा कॅम्पसमधून अधिक्षकांच्या ताब्यात देऊन कर्तव्य बजावले.
पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावर सोमवारी पहाटे गाडीतळ ते बँक ऑफ इंडिया कॉर्नर या रस्त्यावर पहाटेच्या सुमारास दोन शाळकरी मुले पायी चालत फिरताना दिसून आली. या मुलांसोबत कोणीही पालक नसल्याने पोलीसांचे गस्ती पथक पाहून त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने पोलादपूर बिट मार्शल यांनी त्यांना सहज आस्थापूर्वक चौकशी करीत त्यांची नांवे विचारून कोठून आल्याचे विचारले असता हे दोघे विद्यार्थी महाबळेश्वर येथील अंजूमन ऊर्दू हायस्कूल कॅम्पसमधून अज्ञात वाहनाने कोणासही कोणतीही पूर्व कल्पना न देता निसटले असल्याचे समजून आले.
पोलीस हेडकॅस्टेबल व्ही.जी.चव्हाण यांनी दोघांना पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये आणून चौकशी केली असता यापैकी एकाचे नांव अब्दुल महामूद शेख तर दुसर्याचे नांव रहमतल्ला शेख आणि दोघांची वये सात वर्षे असल्याची माहिती प्राप्त झाली. यानंतर हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांनी त्यांच्या हायस्कलच्या प्राचार्यांना या मुलांची माहिती दिली आणि पोलादपूर येथे बोलावून घेतले.
सोमवारी सुमारे पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथील अंजूमन ऊर्दू हायस्कूल कॅम्पसचे अधिक्षक इम्रान इकबाल अहमद शेख यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये आले. पोलादपूर पोलीस ठाण्यातून दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन ते पुन्हा कॅम्पसमध्ये रवाना झाले. पोलादपूर पोलीसांच्या तत्परतेमुळे या दोन लहानग्या मुलांच्या पुढील आयुष्यातील धोक्याची शक्यता टळल्याबद्दल बिट मार्शल व हेडकॉंस्टेबल चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.