प्लॅस्टीक पिशव्या वापराल तर बसू शकतो 25 हजार रुपयांपर्यंत दंड!

12 Jan 2021 15:10:56
Pen Nagarpalika_1 &n
 
पेण नगरपालिकेची धडक मोहीम
 
पेण । पेण शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पेण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात प्लॅस्टीक बंदी करण्यात आली आहे. तरीही, विक्रेते, दुकानदार प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर आढळून येत आहेत. मात्र यापुढे तसे आढळून आल्यास 5 हजार रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पेण नगरपालिकेने दिला आहे.
 
यावेळी शहरातील व्यापारी, दुकानदार यासह फेरीवाले यांनी संपूर्णपणे प्लॅस्टीक तसेच प्लॅस्टीक अंतर्गत येणारे थर्माकोल यांचा कोणताही वापर करू नये, शासनाच्या स्वच्छ मोहिमेच्या माध्यमातून आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिक, दुकानदार, व्यापारी यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. नगरपालिकेच्या हद्दीत उद्यापासून या नियमांचे उल्लंघन करताना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
 
पेण नगरपालिकेने यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील टपरी, दुकाने, हातगाडीवाले व इतर फेरीवाले यांच्याकडे प्लॅस्टीक पिशव्या आढळून आल्या तर पहिल्या गुन्ह्यास 5 हजार रुपये, दुसर्‍या गुन्ह्यास 10 हजार रुपये व तिसर्‍या गुन्ह्यास 25 हजार रुपये व 3 महिने करावासासह दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाईसह 15 दिवसांसाठी दुकान सिल करण्याचा इशारा नगरपालिकेने दिला आहे.
 
प्लॅस्टीक बंदी आणि कोरोनाचे नियम हे सर्वांनी पाळावे, असे आवाहन पेण नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या धडक मोहिमेच्या जनजागृतीला नगराध्यक्षा प्रितम पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, सभापती तेजस्विनी नेने, दर्शन बाफना, शहनाज मुजावर, आरोग्य अधिकारी अंकीता इसाळ, शिवाजी चव्हाण, राजेंद्र नरुटे, अजय क्षिरसागर, शाकीब मुजावर आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0