भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचा आरोप
शेतकऱ्यांचा विरोध असतानाही भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिला चुकीचा अहवाल
अलिबाग | रोहा-मुरुड येथील प्रस्तावित एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या जमिनी सरकारकडे वटवण्यासाठीच एमआयडीसीचा घाट घातला जात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड.महेश मोहिते यांनी केला आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी याबाबत चुकीचा अहवाल सरकारकडे सादर केल्याचेही म्हटले आहे.
अॅड. महेश मोहिते आणि स्थानिक शेतकऱ्यांनी आज (१२ जानेवारी) अलिबाग येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना नको असतानाही हा प्रकल्प स्थानिकांवर लादत असल्याचा आरोप केला आहे.
३२/२ च्या नोटीसीवर या परिसरातील ५० टक्क्यांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत. मात्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल सरकारकडे पाठवला आहे. काही पुढाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतलेल्या जमिनी सरकारला विकून पैसे सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे.
रोहा आणि मुरुडच्या सीमेवर हा प्रकल्प येत असून १४ गावे, वाड्या, शेती बाधित होणार आहे. प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी पहिली नोटीस सरकारने प्रसिद्ध केल्यापासून येथील शेतकरी भयभीत झाला आहे. त्याला शेती विकून नोकरी करण्यात जराही रस नसल्याचे अॅड.मोहिते यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनच्या काळात गावाकडे आलेल्या अनेकांनी शेती करुन पिक घेतले आहे. मोठ्या शहरांमध्ये जाऊन नोकरी करण्यापेक्षा दुबार शेती करुन गावाकडेच राहण्याचा निर्णय घेतलेले तरुणही अनेक आहेत. त्यामुळे भूसंपादनासाठी ३२/२ च्या नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास ७० टक्के लोकांनी यावर हरकती नोंदवल्या आहेत. असे असताना रोहा आणि मुरुड येथील प्रांत अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल शासनाकडे पाठवल्याचे अॅड.मोहिते यांचे म्हणणे आहे.