पालीतील बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम 100 दिवसांपासुन बंद

By Raigad Times    12-Jan-2021
Total Views |
Bank Of Maharashtra pali_
 
सर्वसामान्य नागरिक त्रस्त; खातेदारांनी दिला आंदोलनाचा इशारा
 
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील परळी येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम 100 दिवसापासून बंद आहे. त्यामुळे खेड्यातून येणारे तसेच सर्वसामान्य वर्गातील नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.
 
आठवडा बाजारासाठी येणार्‍या नागरिकांना खास करून अधिक त्रास होत आहे. परळी येथे एकमेव बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम असल्यामुळे तेही बंद असल्यामुळे ग्राहकांना पैशाची देवाणघेवाण करण्याकरिता तासंतास बँकेत रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. येथे बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम मशीन ग्राहकांच्या सेवेत लावण्यात आले असून, एटीएम गेल्या शंभर दिवसापासून बंद असून, त्यामध्ये पैसे सुद्धा टाकलेले नसल्याचे हे एटीएम आज रोजी शोभेची वस्तू म्हणून उभे दिसत आहे. 
 
एटीएम बंद असल्यामुळे रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जांभुळपाडा शाखा व्यवस्थापक विचारणार केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जांभुळपाडा येथे बँक कर्मचार्‍यांच्या प्रमाणात खातेदारांची संख्या अधिक आहे. पैसे काढणारे खातेदार व सर्व प्रकारचा भरणा करणार्‍या ग्राहकांची गर्दी महाराष्ट्र बँकेत सतत असते अशावेळी बँकेत उभे राहिला देखील जागा नसते. वृद्ध लोकांना अधिकच हाल होत आहे. याकडे बँक व्यवस्थापकानी वेळी लक्ष देऊन परळी येथे एटीएम मशीन लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.