ऑनलाईन सोफा विक्री पडली महागात! ग्राहक बनून महिलेला घातला 96 हजारांचा गंडा

By Raigad Times    10-Jan-2021
Total Views |
Fraud _1  H x W 
 
कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
 
पनवेल । ओएलएक्स अ‍ॅपवरुन ऑनलाईन सोफा विक्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सोफा खरेदीच्या बहाण्याने एका भामट्याने ग्राहक बनून या महिलेला एक-दोन नव्हे, 96 हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
रिया दास (रा.रोडपाली) यांच्या घरातील सोफा विकण्याकरिता ओएलएक्स अ‍ॅपवर त्यांनी फोटो आणि किंमत अपलोड केली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा सोफा विकत घेण्यासाठी एक फोन आला. समोरील व्यक्तीने ‘गुगल पे’ला लिंक असलेला मोबाईल क्रमांक पाठविण्यास सांगितले. त्यानंतर त्याने क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितले.
 
क्यूआर कोड स्कॅन केला असता अकाऊंटमधील पैसे जातील, असे दास या समोरील व्यक्तीला बोलल्या असता, त्याने ‘पैसे कट होणार नाहीत तर परत येतील’ असे दास यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दास यांनी ‘गुगल पे’ या अ‍ॅपमधून क्यूआर कोड स्कॅन केला असता त्यांच्या अकाऊंटमधून 4 हजार डेबिट झाले. ते 4 हजार परत येतील, असे सांगून पुन्हा क्यूआर कोड स्कॅन केला. यावेळी पुन्हा 4 हजार वजा झाले.
 
असे एकूण 96 हजार अकाऊंटमधून डेबिट झाल्याने दास यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. अखेर रिया दास यांनी कळंबोली पोेलीस ठाण्यात धाव घेत, याबाबतची तक्रार दाखल केली आहे.