रायगड : घरफोड्या करणारे त्रिकूट जेरबंद

By Raigad Times    01-Jan-2021
Total Views |
रायगड : घरफोड्या करणारे त
 
  • 22 तोळे सोने, वाहने हस्तगत
  • खोपोली पोलिसांची चमकदार कामगिरी
  • खोपोली, पेण, पनवेल, नवी मुंबईतील घरफोड्या, चोर्‍या उघडकीस
 
अलिबाग । रायगडसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये घरफोड्या, चोर्‍या करुन पोलिसांपुढे आव्हान उभे करणार्‍या तीन चोरांच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. खोपोली पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी करत, चोरी केलेले साडेसात लाखांचे 22 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने हस्तगत केली आहेत.
 
खोपोली शहरात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा घरफोड्या व चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले होते. याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश केले होते. त्यानुसार खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व कर्मचार्‍यांचे पथक तयार करण्यात आले.
 
घटनास्थळ तसेच शिळफाटा, चौक फाटा, नवी मुंबई व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यात आले आणि ते जिल्ह्यात, राज्यात प्रसारित करुन चोरांची ओळख पटविण्यात आली. यामध्ये अभिषेक नितीन मिस्त्री (वय 24, रा. महेश पार्क, उमा निवास, ए विंग, रुम नं. 403 नालासोपारा ईस्ट ठाणे), नरेंद्र उर्फ निखील हरपाल सिंग उर्फ सुफियाना खान (रा. रुम नंबर 7, प्लॉट नं.73 एनसीसी अब्दुल हमीद रोड गेट नं.7 मालवणी मालाड वेस्ट मुंबई), यतीन प्रविण सिग्रोजा (वय 32, रा. रुम नं.8 आंबिका सॉमिल कंपाऊंड, सरदार चाळ जास्मीन अपार्टमेन्ट समोर भराडवाडी रोड आंबोली, अंधेरी (प.) यांची नावे पुढे आली.
 
या तिघांवर मुंबई, ठाणे, पालघर व नवी मुंबई येथे 10 ते 15 चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांना पकडण्यासाठी राज्यातील पोलीस कसोशीने प्रयत्न करीत असताना, खोपोली पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. खोपोली पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी, चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले. या दोन्ही घटनांमध्ये 7 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 22 तोळे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. अधिक तपास अमोल वळसंग हे करीत आहेत.
 
दरम्यान, ही कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल वळसंग, पोलीस हवालदार राजेंद्र पाटील, विकास पाटील, पोलीस अंमलदार सतिश बांगर, कादर तांबोळी, दत्तात्रय नुलके, प्रविण भालेराव, प्रदिप खरात यांच्या पथकाने पार पाडली.
 
तिघेही सराईत गुन्हेगार, पेण, खांदेश्‍वर, पनवेल शहरातही केल्या चोर्‍या, घरफोड्या

अटक केलेल्या अभिषेक मिस्त्री, नरेंद्र सिंग उर्फ सुफियान खान व यतिन सिग्रोजा हे सराईत गुन्हेगार असून, त्यांनी मुंबई, नवी मुंबई, पालघर व ठाणे या भागात गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत. खोपोली पोलीस ठाण्याव्यतिरिक्त रायगड जिल्ह्यातील पेण, नवी मुंबई येथील खांदेश्वर, पनवेल शहरातही त्यांनी चोर्‍या, घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.