फेकलेल्या सिगारेटच्या थोटक्यामुळे भडकली आग; खालापूरातील घटना

01 Jan 2021 19:00:04
Fire_1  H x W:  
 
आग नियंत्रणात आणल्याने टळली दुर्घटना
 
संदीप ओव्हाळ/खोपोली । स्मशानात थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गेलेल्या मद्यपींनी टाकलेल्या जळत्या सिगारेटमुळे वणवासदृश्य आग भडकल्याची घटना खालापूरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, अपघातग्रस्त मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी कित्येक झाडे होरपळली आहेत.
 
कोरोनामुळे आलेल्या निर्बंधामुळे अनेकांनी सोयीच्या जागा शोधत थर्टी फर्स्ट साजरा केला. खालापूर शहरातील स्मशानभूमीत शुक्रवारी (31 डिसेंबर) रात्री काही जणांनी पार्टी करताना टाकलेेल्या जळत्या सिगारेटमुळे सुकलेल्या गवताने पेट घेतला. आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केल्यावर मद्यपींनी पळ काढला.
 
जवळच असलेल्या पेट्रोलपंपावरील कामगारांनी पेट्रोलपंपाच्या दिशेने येणारी आग विझवली. परंतु दुसर्‍या बाजूने आग भडकत जाऊन नजीकच्या फार्महाऊसमध्ये पसरली. आगीच्या घटनेची माहिती अपघातग्रस्त मदत पथकाचे हनीफ कर्जीकर आणि खालापूरातील उद्योजक महेश राठी यांना समजल्यावर तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
 
खोपोलीहून अग्निशामक बंबदेखील बोलाविण्यात आला. परंतु रस्ता अरुंद असल्याने अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचू शकला नाही. अखेर अग्निशामक दलातील कर्मचारी आणि महेश राठी यांनी झाडाच्या फांद्या तोडून पसरणारी आग आटोक्यात आणली. मात्र बरीच झाडे होरपळून निसर्गाची हानी झाली आहे.
Powered By Sangraha 9.0