न्यायालयाच्या निर्णयानंतर मुरली मनोहर जोशी यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…आज सर्व आरोपींची न्यायालयाकडून करण्यात आली निर्दोष मुक्तता

By Raigad Times    30-Sep-2020
Total Views |

 
न्यायालयाच्या_1 &nbs

 
 
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनौच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं. तसंच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगण्यात आलं. निकाल सुनावला जात असताना २६ आरोपी कोर्टात हजर होते. लालकृष्ण अडवाणी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. न्यायालयाच्या निकालानंतर भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया देत आता हा वाद संपला पाहिजे असं म्हटलं.
 

“आमचं आंदोलन कोणत्याही षडयंत्र नव्हतं हे सिद्ध झालं. आम्हाला खुप आनंद झाला आहे. न्यायालयानं आता हा निर्णय दिला असून हा वाद संपला पाहिजे. संपूर्ण देशाला राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला लागलं पाहिजे,” असं मुरली मनोहर जोशी म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “राम मंदिराचं आंदोलन एक ऐतिहासिक क्षण होता. आज न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुरूवातीपासून आम्ही प्रत्येक जे सत्य होतं तेच न्यायालयासमोर मांडलं. सर्व वकिलांच्या मेहनतीमुळे आणि लोकांच्या साक्षीमुळे हा निर्णय आज आला आहे. आता राम मंदिराच्या उभारणीचं कार्य सुरू होणार आहे. जय सिया राम, सबको सन्मती दे भगवान,” असंही ते म्हणाले.

 

सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितलं की, “विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही”. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचं निदर्शनात आल्याचं न्यायालयाने यावेळी सांगितलं. या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

 

३५१ साक्षीदार आणि ६०० कागदपत्रांचे पुरावे

 

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.
 
न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.