हाथरस : ‘तू बोलू नयेस म्हणून…’; प्रियदर्शन जाधव संतापला, आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची केली मागणी

By Raigad Times    30-Sep-2020
Total Views |

बलात्काराप्रकरणी_1 &
 
 
हाथरस सामुहिक बलात्काराप्रकरणी प्रियदर्शन भावूक
हाथरस : ‘तू बोलू नयेस म्हणून…’; प्रियदर्शन जाधव संतापला, आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची केली मागणी
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामुहिक बलात्कार पीडित १९ वर्षीय दलित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाचं वातावरण पसरलं असून अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यातच बॉलिवूडप्रमाणेच मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटीदेखील या प्रकरणी व्यक्त होत आहेत. यामध्येच अभिनेता प्रियदर्शन जाधव भावूक झाला असून त्याने या घटनेचा निषेध केला आहे. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
प्रियदर्शन जाधव याने फेसबुक आणि ट्विट अशा दोन्ही माध्यमातून त्याचं मत मांडलं आहे. यामध्ये “तू बोलू नयेस म्हणून तुझी जीभ कापली……………..#निशब्द”, असं कॅप्शन देत प्रियदर्शनने फेसबुकवर या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे ट्विटरवर ‘लज्जास्पद’ असं म्हणत त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणेच उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे सामुहिक बलात्काराची घटना घडली. चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ कापली आणि तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २९ सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.