करोना संकटातही ‘फॅन्सी नंबर’साठी ‘क्रेझ’ कायम, ‘0009’ साठी मोजले तब्बल ‘इतके’ रुपये

By Raigad Times    30-Sep-2020
Total Views |
गाड्यांची विक्री झाली कमी, पण चॉइस नंबरचं वेड कायम
करोना संकटातही ‘फॅन्सी नंबर’साठी ‘क्रेझ’ कायम, ‘0009’ साठी मोजले तब्बल ‘इतके’ रुपये
 
करोना_1  H x W:
 
 
दिल्लीकरांचं गाडीच्या चॉइस नंबरसाठीचं वेड करोना संकटकाळातही कमी झालेलं नाही. करोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातही ‘0009’ या फॅन्सी नंबरसाठी तब्बल 10.1 लाख रुपयांची बोली लागल्याचं समोर आलं आहे. करोना संकटकाळात फॅन्सी नंबरसाठी लागलेली ही सर्वात मोठी बोली असल्याचं सांगितलं जात आहे.
11 सप्टेंबर रोजी ‘0009’या फॅन्सी नंबरसाठी दिल्लीमधील एका व्यक्तीने 10.1 लाख रुपयांची बोली लावली. सप्टेंबरमध्येच ‘0003’ आणि ‘0007’ नंबरसाठीही प्रत्येकी 3.1 लाख रुपयांची बोली लागली होती. तर, जुलै महिन्यातही फॅन्सी नंबरसाठी बोली 7.1 लाखापर्यंत गेली होती. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, फॅन्सी नंबरच्या ई- लिलावाद्वारेच दिल्लीच्या वाहतूक विभागाने ऑगस्टमध्ये 33.3 आणि जुलैमध्ये 33.8 लाख रुपयांची कमाई केली आहे.
ई-लिलाव पुन्हा सुरू :
लॉकडाउनमुळे मार्च महिन्यात फॅन्सी नंबरसाठीचा ई-लिलाव बंद करण्यात आला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये लिलावास पुन्हा सुरूवात झाली. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात दिल्लीच्या वाहतूक विभागाने फॅन्सी नंबर्सच्या ई-लिलावाद्वारे 99.6 लाख रुपयांची कमाई केली. मागील वर्षी याच काळात तब्बल 4.6 कोटी रुपयांची कमाई केली होती. दरम्यान, दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी हे चांगले संकेत असल्याचं म्हटलं आहे. तर, जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात गाड्यांची विक्री पुन्हा कमी झाली आहे, पण लोकांचं फॅन्सी नंबरसाठीचं क्रेझ कमी झालेलं नसल्याचं समोर येत आहे.