कर्जत : व्यापार्‍याला गंडा घालून फरार झालेला भामटा गजाआड

By Raigad Times    30-Dec-2020
Total Views |
Raigad crime news_fraud m
 
2 किलो सोन्याच्या मण्यांचे आमिष दाखवून केली फसवणूक
7 लाख लुबाडून झाला होता फरार
आमिषाला बळी पडू नका; रायगड पोलिसांचे आवाहन 
 
कर्जत । 2 किलो सोन्याचे मणी विकत देण्याचे आमिष दाखवत व्यापार्‍याला 7 लाखांचा गंडा घालून फरार झालेल्या भामट्याला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 4 महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर पुण्यातील लोणी काळभोर येथून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
 
कर्जत शहरातील नामांकीत व्यापारी नेहमीप्रमाणे 18 ऑगस्ट 2020 रोजी आपला व्यवसाय करीत होते. यावेळी दोन अज्ञात इसम त्यांच्याकडे आले आणि ‘गुजरात येथे जे.सी.बी. मशीनने खोदकाम करीत असताना एका लोट्यामध्ये सोन्याचे मणी मिळालेले आहेत’ अशी बतावणी करत, त्यापैकी काही सोन्याचे मणी त्या व्यापार्‍याला देत ते ‘चेक करुन सोन्याचे आहेत का? हे आम्हाला सांगा’ असे सांगितले.
 
सदरचे मणी हे सोन्याचेच असल्याची व्यापार्‍याची खात्री झाल्याने, व्यापार्‍याने त्या दोघांवर विश्‍वास ठेवला. आपल्याकडे असे 2 किलो सोन्याचे मणी असल्याचे सांगून, ते विकत घ्यायचे असतील तर 8 लाख रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी व्यापार्‍याला सांगितले. त्यावर चर्चा होऊन 7 लाख रुपयांमध्ये 2 किलो सोन्याचे मणी विकत घेण्याचा व्यवहार ठरला.
 
सदर व्यापार्‍याने 7 लाख रुपये जमा केले आणि पनवेल येथे जाऊन त्या दोन इसमांना व त्यांच्या इतर साथीदारांना ते दिले. त्याबदल्यात 2 किलो सोन्याचे मणी विकत घेतले. त्यानंतर या व्यापार्‍याने सोनाराकडे जाऊन ते चेक केले असता त्यावर सोन्याचे पिवळे पॉलिश केल्याचे आढळून आले. तर ते मणी अ‍ॅल्युमिनीअमचे असल्याचे स्पष्ट झाल्याने, या व्यापार्‍याच्या पायाखालची जमीन सरकली.
 
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने, या व्यापार्‍याने कर्जत पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात भामट्यांविरोधात संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी 25 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक गावडे व पोलीस अंमलदार भूषण चौधरी हे करीत होते.
 
तांत्रिक पुराव्यांची मदत घेऊन 15 दिवसांमध्ये दोन भामट्यांना बदलापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीमध्ये पोलिसांना ब्रिटीशकालीन सन 1936 व 1983 सालातील चांदीची नाणी व सोन्याचे मणी सापडले. अधिक चौकशीत त्यांचा साथीदार व मुख्य सूत्रधार लखन दौलत सोलंकी हा असून, तो वांगणी ता.अंबरनाथ येथे राहत असल्याची माहिती पुढे आली. मात्र आपल्या साथीदारांना अटक झाल्याचे कळताच लखन दौलत सोलंकी हा तेथून फरार झाला.
 
तेव्हापासून कर्जत पोलीस त्याच्या मागावर होते. चार महिन्यानंतर मंगळवारी (29 डिसेंबर) फरार लखन दौलत सोलंकी हा लोणी काळभोर जि.पुणे येथे लपून बसल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक लोणी काळभोर येथे रवाना झाले आणि मुख्य सूत्रधार लखन सोलंकीच्या मुसक्या आवळण्यात कर्जत पोलिसांना यश आले. अधिक तपासात त्याचे आणखी काही साथीदार असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
 
अधिक चौकशीत लखन सोलंकी याने कळवा पोलीस ठाणे, एैरोली पोलीस ठाणे, नवी मुंबई परिसरातसुध्दा फसवणुकीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून आणखी फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 
दरम्यान, पोलीस अधीक्षक अशोक दुधे व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर व पोलीस निरीक्षक अरूण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस नाईक सचिन नरूटे, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे यांनी ही यशस्वी कारवाई केली.
-----------------------------------------------------------------------
आमिषाला बळी पडू नका; रायगड पोलिसांचे आवाहन
 
कोणीही इसम आपल्याकडे येऊन वरील प्रमाणे फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता तात्काळ पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन रायगड पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.