न्यायालयीन प्रकरणाची माहिती घेणे पक्षकारांना झाले सोईचे
अलिबाग । अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात मुख्य प्रवेशद्वारावर ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रशासनाकडून पुरविण्यात येणार्या या ऑनलाईन सुविधांमुळे न्यायालयातील प्रकरणाची माहिती घेणे आता पक्षकारांना अधिक सोईचे होणार आहे.
सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या 25 एप्रिल 2020 रोजीच्या मार्गदर्शिकेप्रमाणे संपूर्ण देशात प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर ई-सेवा केंद्र स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय प्रकल्प समन्वयक, उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील 9 मे 2020 रोजीच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालय-रायगड-अलिबाग येथे या ई-सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
हे ई-सेवा केंद्र न्यायालयीन कामकाजाच्या वेळेपर्यंत सुरू राहणार आहे. मंगळवारी (22 डिसेंबर) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांच्या हस्ते या ई-सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अलिबाग मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील व कर्मचारी उपस्थित होते.
या ई-सेवा केंद्रामार्फत खटल्याची स्थिती, सुनावणीची पुढील तारीख आणि इतर तपशीलाविषयी माहिती देणे, ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा, ई-स्टँप पेपर्स ऑनलाईन खरेदी, तुरुंगातील बंदी आरोपीच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी ई-मुलाखत सुविधा उपलब्ध करणे, विनामूल्य कायदेशीर सेवा कशा मिळवायच्या याबद्दल लोकांना मार्गदर्शन करणे, ट्रॅफीक चलन केसेस आभासी न्यायालयात निकाली काढणे, ई-कोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत डिजिटल सेवा-सुविधांसंदर्भात सर्व शंकांचे निराकरण करणे या व इतर सुविधा पक्षकार व वकीलांना मिळणार असल्याची माहिती जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक अशोक लांगी यांनी दिली.
दरम्यान, या ई-सेवा सुविधांचा पक्षकारांनी व वकीलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांनी केले आहे.