जेएनपीटी खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विश्वस्त मंडळाची मंजुरी

24 Dec 2020 18:57:33
JNPT Uran_1  H  
 
कामगार विश्वस्तांचा विरोध कायम...
 
अनंत नारंगीकर/जेएनपीटी । मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या जेएनपीटीच्या खाजगीकरणाच्या शक्यतांवर आज (24 डिसेंबर) जेएनपीटी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. आजच्या बैठकीत सर्वपक्षीय संघर्ष समितीचा आणि कामगारांचा विरोध झुगारुन जेएनपीटी कंटेनर टर्मिनलच्या खाजगीकरणाच्या (पीपीपी) प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
 
आजच्या बैठकीत जेएनपीटीचे कामगार विश्वस्त भूषण पाटील आणि दिनेश पाटील यांनी जेएनपीटी खाजगीकरणाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. मात्र इतर उपस्थित सर्व सरकार नियुक्त सदस्यांनी खाजगीकरणाच्या प्रस्तावाच्या बाजूने आपले मत नोंदविल्याने हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जेएनपीटीचे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिली.
 
जेएनपीटी स्वतः चालवित असलेले हे टर्मिनल गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असून जेएनपीटीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे नौवहन मंत्रालयाने हे बंदर सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
जेएनपीटीचे हे टर्मिनल 30 वर्षांच्या लीजवर (भाडे तत्वावर) जो जास्त लिलावाची बोली लावेल त्याला देण्याचे धोरण आहे. नुकतेच खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटीवर भाजपावगळता सर्व पक्षांनी मोर्चा काढला होता. त्याच अनुषंगाने आज विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला.
 
या बैठकीला दोन कामगार विश्वस्तांसह एकूण 9 विश्वस्त उपस्थित होते. यामधील 5 विश्वस्तांनी आपले मत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवले. कामगार विश्वस्तांव्यतिरिक्त कोणीही या ठरावाला विरोध केला नसल्याचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------- 
जेएनपीटीच्या अध्यक्षांनी आमची मतदानाची मागणी मान्य न करता हा ठराव मंजूर केला असल्याने हा ठराव बेकायदेशीरपणे मंजूर केला आहे. आम्हाला आमची भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच चेअरमन संजय सेठी हे बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याने आम्ही जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांचा निषेध करतो.
- कॉ. भूषण पाटील, कामगार विश्वस्त)
-------------------------------------------------------------------
 
बैठकीला उपस्थित असलेल्या विश्वस्तांपैकी भूषण पाटील आणि दिनेश पाटील या दोन कामगार विश्वस्तांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्या दोघांना बैठकीत 40 मिनिटे आपले मत मांडण्यासाठी देण्यात आली होती. त्या दोघांचा या प्रस्तावाला विरोध असल्याचे इतिवृत्तात नोंदवले आहे.
- उन्मेष वाघ, डेप्यूटी चेअरमन, जेएनपीटी
-------------------------------------------------------------------  
Powered By Sangraha 9.0