म्हसळा : वनपाल, वनरक्षकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या

By Raigad Times    21-Dec-2020
Total Views |
Mhasala Van Vibhag_1 
 
मुख्य वनसचिवांकडे मागणी
 
म्हसळा । राज्यातील वनपाल, वनरक्षक यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ व ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवृत्त वनक्षेत्रपाल एस.जी.धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्य वनसचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
आश्वासित प्रगती योजनेचा लाभ वनपाल-वनरक्षक यांना मिळावा, यासाठी राज्यातील सहा वन विभागातील कर्मचार्‍यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एस.जी.नलावडे, बाळकृष्ण गोरनाक यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारी कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजना चालू केली, वनखात्यातील वनपाल-वनरक्षक ठाणे वनवृत्ताने आश्वासित प्रगतीचा लाभ दिला. वनरक्षक-वनपाल यांना 1976 चे सेवा शर्तीप्रमाणे तो लाभ देण्यात आला; परंतु त्यानंतर शासनाच्या आदेशाचा चुकीचा आणि सोयीस्कर अर्थ लावून तो काढून घेण्यात आला. संघटनेमार्फत इतर 42 खात्यांकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देताना कुठेही शैक्षणिक पात्रतेची अट नसल्याचे लेखी आदेश काढून केवळ वनविभाग त्याला अपवाद असल्याचे सांगण्यात येते, हे अन्यायकारक असल्याचे अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.
 
त्याचप्रमाणे ‘समान काम-समान वेतन’ या आदेशाची अंमलबजावणी करण्यास वन विभाग जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहे. विधी व न्याय विभागाचीही ठाणे वनवृत्ताने दिशाभूल केली असून न्यायालयात खटला दाखल केला आहे. कुठल्याही परिस्थितीत कर्मचार्‍यांना न्यायालयात ओढणे, यामागे त्रास देण्याचा दृष्टीकोन असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. राज्यातील 12 हजार कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ झाला असून केवळ 1200 कर्मचारी या योजनेपासून वंचित राहिले असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
 
या योजनेचा लाभ उर्वरित सर्व कर्मचार्‍यांना व्हावा, यासाठी ठाणे, रोहा, पुणे, नाशिक, भोर, जव्हार, शहापूर विभागातील अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांची सभा घेऊन न्याय देण्याची मागणी राज्याचे मुख्य वनसचिव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.