संकेतने बनवला अॅडजेस्टेबल हेल्मेट
मिलिंद अष्टीवकर / रोहा । रोह्यातील संकेत सदाशिव कुंभार याने फुल फेस फोल्डेबल व अॅडजेस्टेबल मोटारसायकल हेल्मेट बनविले आहे. 15 आणि 16 डिसेंबर रोजी झालेल्या ऑनलाईन ‘अन्वेषण’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत त्याने बेसिक सायन्स विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठात तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी विभागात शिकत आहे.
बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या हेल्मेटच्या समस्या लक्षात घेता त्याच्या असे लक्षात आले की बरेच लोक हेल्मेट वापरणे टाळतात; त्यामुळे त्यांना अपघातांना सामोरे जावे लागते, तसेच पोलिसांच्या कारवाईलाही सामोरे जावे लागते. बाजारात उपलब्ध असणारे पारंपरिक हेल्मेट हे आकाराने मोठे असल्याने ते हाताळाने अनेक लोकांना त्रासदायक वाटते. तसेच पारंपारिक हेल्मेट हे विशिष्ट साईज मध्येच उपलब्ध असते. त्यामुळे हेल्मेट निवडताना अनेक लोकांचा गोंधळ उडतो किंवा हेल्मेट विकत घेतल्यानंतर काही काळानंतर ते सैल पडायला लागते.
या सर्व समस्यांवर उपाय म्हणून संकेतने फोल्डेबल व ऍडजेस्टेबल हेल्मेट तयार केले आहे. तयार केलेले हेल्मेट हे अर्ध्या आकारात फोल्ड होत असल्यामुळे आपण ते बॅगमध्ये किंवा दुचाकीच्या डिक्की मध्ये सहज घेऊन जाऊ शकतो. तसेच हे हेल्मेट दुचाकी वर सुद्धा अडकवण्याची आणि लॉक करण्याची सुविधा करण्यात आली आहे. या हेल्मेटच्या विशिष्ट रचनेमुळे हे हेल्मेट आपल्या डोक्याच्या आकारानुसार आपण अॅडजेस्ट करू शकतो. वापरकर्ते या हेल्मेटला ओपन फेस मोड मध्ये सुद्धा वापरू शकतात.
महत्त्वाचे म्हणजे या हेल्मेट मध्ये दुचाकीस्वाराचा सुरक्षिततेवर आणि आरामदायी वापरावर भर घालण्यात आला आहे.
या नवीन आविष्काराने विद्यापीठ पातळीवर प्रथम येत 2020 मध्ये ‘अविष्कार’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत ‘बेस्ट इनोवेशन इन महाराष्ट्र’ हा पुरस्कार मिळवला होता. 20 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे झालेल्या ‘अन्वेषण’ संशोधन स्पर्धेत त्याची पश्चिम विभागातून देशपातळीवर निवड झाली होती. या स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठांनी सहभाग नोंदविला होता. 15 आणि 16 डिसेंबर रोजी राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय, भोपाळ येथे एआययु तर्फे घेण्यात आलेल्या ‘अन्वेषण’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत त्याने बेसिक सायन्स विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महत्वाचे म्हणजे रोह्यासारख्या ठिकाणी राहत, त्याने एवढे मोठे संशोधन करून यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या यशामध्ये त्याला त्याचे आई-वडील, सर्व प्राध्यापक आणि सर्व मित्रांनी सहकार्य केले. या हेल्मेटचे त्याने पेटंट फाईल केलेले आहे आणि भविष्यात हे फोल्डेबल व अॅडजेस्टेबल हेल्मेट लवकरच बाजारामध्ये उपलब्ध करण्यासाठी संकेत कुंभारचे प्रयत्न चालू आहेत.