सावरोली गावात ग्रामपंचायतीसह 19 वीज चोरांविरुद्ध कारवाई

07 Nov 2020 17:20:43

mseb kalyan_1  
 
गेल्या महिनाभरात वीज चोरांकडून 55 लाख रुपये वसूल
 
कल्याण । महावितरणच्या शहापूर उपविभागातील सावरोली गावात शनिवारी भल्या पहाटे केलेल्या तपासणीत 19 ठिकाणी विजेचा चोरटा वापर आढळून आला. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा पंपासाठी वीजचोरी होत असल्याची धक्कादायक बाब या तपासणीत उघड झाली.
 
शहापूर उपविभागात गेल्या महिनाभरापासून वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत वीज चोरांकडून 55 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक तसेच सार्वजनिक उपक्रमासाठी विजेचा अनधिकृत वापर टाळण्याचे व वीजचोरीबाबत माहिती देऊन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
 
उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पहाटे सावरोली गावातील वीजपुरवठ्याची तपासणी करण्यात आली. यात 19 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले. या वीज चोरांनी सुमारे 35000 युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा पंपासाठी वीजचोरी होत असल्याचे आढळून आले असून यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यातील शहापूर, धसई, किन्हवली, सोगाव, चेरपोली, पवारपाडा, अल्याणी, गुंडे, खराडे, आसनगाव, साने, सापगाव व परिसरातील गावांमध्ये वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
 
या चोरट्यांनी चोरून वापरलेल्या विजेचे 55 लाख रुपयांचे वीजबिल वसूल करण्यात आले आहे. यापुढेही वीज चोरट्यांविरुद्ध धडक मोहीम सुरूच राहणार आहे. यात ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना, पथदिवे, कुकूटपालन केंद्र, वीटभट्ट्या यांच्या वीज पुरवठ्याची प्रामुख्याने तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या उपक्रमासाठी वीजचोरी आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा उपकार्यकारी अभियंता कटकवार यांनी दिला आहे.
 
मुख्य अभियंता अग्रवाल, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावडे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता कटकवार, सहायक अभियंते चेतन वाघ, सुरज आंबुर्ले, विश्वजीत खैतापूरकर यांच्यासह कर्मचार्‍यांच्या 35 जणांच्या पथकाने ही कारवाई केली.
Powered By Sangraha 9.0