अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णव गोस्वामींच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान

By Raigad Times    05-Nov-2020
Total Views |
Arnab Goswami Arrest_1&nb
 
  • सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल
  • 7 नोव्हेंबरला होणार सुनावणी
अलिबाग । अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकार पक्षातर्फे आज न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर 7 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
 
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात काल (4 नोव्हेंबर) रायगड पोलिसांनी पत्रकार आणि अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह आयकास्ट स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स’चे नितेश सारडा यांनाही अटक करण्यात आली होती.
 
अटकेनंतर त्यांना येथील मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून तिघांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी पोलीस कोठडी नाकारत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
 
या आदेशाविरोधात आज (5 नोव्हेंबर) रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 7 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज अर्णब गोस्वामींनी मागे घेतला आहे. तसेच त्यांना झालेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
 
गोस्वामींच्या याचिकेवर उच्च न्यायालयात उद्या सुनावणी
या प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती द्यावी, अलिबाग आणि महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर रद्द करावी आणि तातडीनें सुटका करावी अशा मागण्या उच्च न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर उद्या (5 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे.
 
दरम्यान, न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत गोस्वामींना न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा अलिबाग मुक्काम वाढला आहे.
काय आहे प्रकरण?
इंटेरिअर डिझायनर असलेले अन्वय नाईक हे कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. 5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता.
 
अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन वाहिनीसाठीच्या स्टुडिओचे काम केले होते. स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनच्या कामाची जबबाबदारी त्यांच्यावर होती. यासाठी 5 कोटी 40 लाख इतके बिल अर्णब गोस्वामी यांच्याकडून येणे होते. पण, वारंवार बिल मागूनही गोस्वामींकडून बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती.
 
आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब तसेच फिरोज शेख, नितेश सारडा यांना जबाबदार धरले होते. या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात भादंवि कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.