रायगडचे माजी जिल्हाप्रमुख रवि मुंढे यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

By Raigad Times    24-Nov-2020
Total Views |
Ravi mundhe_1  
 
आमच्या मरणावर टपली चार गिधाड : रवी मुंढे
 
विराज टिळक / संजय रिकामे । शिवसेनेने माजी जिल्हाप्रमुख रवि मुंढे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. तळा नगरपंचायतची शिवसेनेचे नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्यात जोरदार वाद सुरु होते.दोघांकडूनही एकमेकांवर छुपे वार केले जात होते. आज या वादाला मुंढे यांनीच तोंड फोडले आहे. त्यानी शिवसेनेचे नगरसेवकांवर टक्केवारीसाठी ठेकेदाराला पळवून लावत असल्याचा आरोप केला आहे.
 
रवी मुंढे यांनी आज (दि.24 नोव्हेंबर) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांवर तसेच पदाधिकार्‍यांवर आगपाखड केली आहे.
 
तळा नगरपंचायतीमध्ये माझी पत्नी नगराध्यक्षा आहे. परंतु विकासकामे करत असताना शिवसेनेचेच नगरसेवक आणि पदाधिकारी त्रास देत आहेत. मी निधी मंजुर करुन आणतो परंतु शिवसेनेचेच नगरसेवक ठेकेदाराकडुन टक्केवारी मिळविण्यासाठी दादागिरी करत कंत्राटदाराला पळवून लावत असल्याचा खळबळाजनक आरोप रवी मुंढे यांनी केला आहे.
 
तळा नगरपंचायतीची निर्मिती झाल्यानंतर शिवसैनिकांच्या आग्रहा खातर मी माझ्या पत्नीला नगराध्यक्षा पदासाठी उभे केले. सर्व शिवसेना उमेदवारांना निवडुन देखील आणले. यानंतर शहराला भेडसावणारी पाणी समस्या, रस्त्यांचे डांबरीकरण, गटारांचे बांधकाम, अंतर्गत ठोकळ्यांचे रस्ते, नवीन शौचालय, सामाजिक सभागृह, घण कचर्‍याचे नियोजन यासाठी वरिष्ठ पातळीवरुन निधी आणला परंतु आमचेच नगरसेवक विकासकामांसाठी विरोध करत आहेत.
 
शिवसेनेच्याच नगरसेवकांच्या आडमुठ धोरणामुळे कंत्राटदार काम सोडुन गेले ते परत आलेच नाहीत त्यामुळे कामे पण अर्धवट अवस्थेत राहीली आहेत. बहुचर्चित तळा पाणी पुरवठा योजना मंजुर झाली आहे परंतु शिवसेनेचे नगरसेवक नगराध्यक्षांना डावलून ही योजना आम्हीच मंजुर केली असल्याचा खोटा आव आणत असल्याचे मुंढे यांनी म्हटले आहे.
 
शिवसेना खासदारांच्या फंडातुन नगरपंचायत हद्दीत कुणबी समाजासाठी भव्य समाज मंदीर बांधण्यात आले. परंतु नगरपंचायत नगराध्यक्षा असूनही रेश्मा मुंढे आणि मला उदघाटनाच्या कार्यक्रमात डावलण्यात आले. प्रोटोकॉल म्हणुन नगराध्यक्षा यांचे नाव उदघाटनाच्य पाटीवर असायला हवे होते ते सुध्दा टाकण्यात आलेले नाही.
 
अडीच वर्षानंतर नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा सर्वसाधारण आरक्षण पडल्यानंतर माझ्या पत्नीस पुन्हा उभे रहावे असे नगरसेवकांकडुन सांगण्यात आले परंतु तीला पाडण्यासाठी अंतर्गत मोहीम सुरु असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला, काही नगरसेवक खंडणीखोर असुन तालुका प्रमुख केवळ विकासकामांचे कंत्राट घेण्यासाठी आले असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.
 
या सर्व बाबतीत जिल्हा प्रमुखांकडे चर्चा झाली आहे परंतु ते ही लक्ष देत नाहीत. केवळ नगराध्यक्षा आणि मला बदनाम करण्याचा डाव सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (दि.27)नोव्हेंबर रोजी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि प्रभाग निहाय आरक्षण सोडत पडणार असुन त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन.
 
दरम्यान, आरक्षण पडण्यापुर्वीच तळा नगरपंचायत निवडणुकीत आता रंग येण्यास सुरवात झाली असुन माजी जिल्हा प्रमुख कोणता झेंडा हाती घेतात याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तूर्तास त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले