शेकाप समोरासमोर लढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही - आ. जयंत पाटील

By Raigad Times    23-Nov-2020
Total Views |
mangoan_1  H x
 
माणगाव येथील कार्यकर्त्यांच्या सभेत आ. जयंत पाटील कडाडले
 
माणगाव । शेकाप पाठीत खंजीर खुपसत नाही तर समोरासमोर लढतो. युुज अँड थ्रो करणारे आम्ही नाही, उपकाराची जाणीव ठेवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. चार पिढ्यांचा शेकापला वारसा आहे...शेवटी सत्याचाच विजय होतो असे म्हणत, शेकापचा मतलबी वापर करणार्‍यांवर शेकाप नेते आ. जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते माणगाव येथे बोलत होते.
 
mangoan_1  H x
 
शेतकर्‍यांचा घात करणार्‍या शेतीविषयक केंद्र सरकारच्या विरोधात शेकापने मोर्चा बांधला आहे. सरकारचे नवे कृषी धोरण शेतकर्‍यांच्या मुळावर येणारे आहे. याला विरोध करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केेले आहे.
 
यापार्श्वभुमिवर आ. जयंत पाटील हे कार्यकर्त्यांना साद घालण्यासाठी जिल्ह्याभरात दौरे करत आहेत. रविवारी (22 नोव्हेंबर) रोजी ते माणगाव येथे आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आजही शेतकरी, कष्टकरी, कामगार आपल्यावरील अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा खरपुस समाचार घेत आमदार जयंत पाटील यांनी माणगाव येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन सभेत केंद्र सरकारच्या कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या धोरणाविरुद्धच्या लढाईसाठी वज्रमुठ बांधीत येत्या 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्यालय येथे विराट मोर्चा साठी उपस्थित रहा असे आवाहन केले आहे.
 
रायगडात शेकाप संपला म्हणार्‍यांनी मतांची आकडेवारी एकदा बघीतली पाहीजे. शेकापला अलिबागमध्ये 89 हजार ,पेणमध्ये 90 हजार,पनवेलला 91 हजार तर उरणमध्ये 60 हजार मते विधानसभेला पडली आहेत. जिल्हा परिषदेत नंबर एकचा पक्ष शेकाप आहे. शेकाप हा कधीही न संपणारा पक्ष आहे.
 
आमच्या समोर एकएकटे लढा आम्ही आमची ताकद दाखवून देतो असा इशारा आ. पाटील यांनी दिला आहे.