१०५ ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा पनवेल महापालिकेच्या सेवेत समावेश

23 Nov 2020 21:05:00
Panvel Municipal Corporat 
 
उर्वरित कर्मचार्‍यांना पुढील टप्प्यात सामावून घेणार
 
पनवेल : पनवेल महापालिकेत काम करणार्‍या तत्कालीन ग्रामपंचायतींच्या १०५ कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे. नगरविकास खात्याकडून या प्रश्‍नासंदर्भातील जीआर काढण्यात आला असून पहिल्या टप्प्यात १०५ कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित कर्मचार्‍यांचा पुढील टप्प्यात समावेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
१ ऑक्टोबर २०१६ रोजी पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी महापालिकेत समावेश व्हावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. महापालिकेच्या या समावेशन प्रकियेला जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली. कर्मचारी समावेशनासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.
 
मोठ्या विलंबानंतर कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला हा अहवाल २५ जानेवारी २०१९ रोजी दिला. अहवाल सरकारला सादर करूनही त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचार्‍यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर आज पहिल्या टप्प्यात १०५ कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Powered By Sangraha 9.0