बोर्ली फाटा ते बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र रस्त्याचे भूूमिपूजन

By Raigad Times    23-Nov-2020
Total Views |
 MLA mahendra dalvi_1 
 
महेंद्र दळवी यांच्या हस्ते कामाला सुरुवात
रुग्णांसह प्रवाशांची खड्ड्यांपासून होणार सुटका
 
कोर्लई । मुरुड-साळाव या राज्य महामार्गादरम्यान असणार्‍या बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील बोर्ली फाटा ते बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे प्रचंड दूरवस्था झाली होती. मात्र लवकरच या खराब रस्त्यातून रुग्णांसह प्रवाशांची सुटका होणार आहे. आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
 
आ. महेंद्र दळवी यांनी सांगितले की, या रस्त्याची दुर्दशा झाली होती. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना, शाळकरी मुलांच्या बसेस, वाहनचालक, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. बोर्ली गावात असणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित होता.
 
प्रत्येक वेळेस भूमिपूजन केले जाते, मात्र कोणत्या तरी कारणाने रस्ता रखडतो. मात्र लवकरच या खराब आणि खड्डेमय रस्त्यातून प्रवाशांची सुटका होणार आहे. बोर्लीचे माजी सरपंच नौशाद दळवी यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विशेष बाब म्हणून या रस्त्याला मंजुरी दिली आहे. या रस्त्यासाठी बोर्ली शाखाप्रमुख भारत भोईर यांनीही सतत अलिबाग येथे जाऊन पाठपुरावा केला असल्याचे आ. दळवी यांनी सांगितले.
 
यावेळी जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ, तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, बोर्ली शाखाप्रमुख भारत मोती, निवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भोईर, मनोज कमाने, विलास पालवणकर आदीसहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या रस्त्यामुळे बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.