पालकांची संमती असेल तरच रायगडातील शाळा सुरु करणार - आदिती तटकरे

By Raigad Times    22-Nov-2020
Total Views |
file photo_1  H
 
अलिबाग/ बोर्लीपंचतन । रायगड जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय झाला असला तरी, पालकांची संमत्ती नसेल त्याठिकाणच्या शाळा सुरू होणार नाहीत, अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
 
उद्या, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरू होत आहे. शाळा, कॉलेज सॅनिटाईज करण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांची कोरोना तपासणीही बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र आजपर्यंत केवळ वीस ते तीस टक्केच शिक्षकांची तपासणी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोमवारचा मुहूर्त टाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
पनवेल महापालिकेने शाळा सुरु करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर उर्वरित जिल्ह्यातही मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? याबाबत चलबिचल सुरु आहे. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांना विचारणा केली असता, 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. मात्र पालकांच्या संमतीनेच शाळा सुरु होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
 
रायगड जिल्हातील ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकून शासनाला शाळा सुरु करावयाच्या नाहीत तर शाळा सुरु करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचा सूचना दिल्या आहेत तर पालकांची जिथे संमत्ती नसेल त्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाहीत, अशी भूमिका आदिती तटकरे यांनी स्पष्ट केली आहे.