रोहा तालुक्यातील प्रस्तावित बल्क ड्रग फार्मा पार्कला स्थानिकांचा विरोध

By Raigad Times    21-Nov-2020
Total Views |
roha_1  H x W:
 
मिलिंद अष्टीवकर / रोहा तालुक्यातील सात गावांत बल्क ड्रग फार्मा पार्क उभारण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने संबंधित गावातील शेतकऱ्यांना ३२(१) च्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित प्रकल्पाबाबत स्थानिकांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. या गावातील नागरिकांच्या जमिनी बळजबरीने संपादन करण्याचे शासनाचे धोरण दिसून येत आहे. न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील न्हावे, नवखार, सोनखार या गावातील नागरिकांनी एकत्र येत या प्रकल्पाला विरोध करत निषेधाचे फलक सर्वत्र लावले आहेत.
रोहा तालुक्यातील खुटल, न्हावे, नवखार, सोनखार, दिव, बेलखार, पारंगखार या सात गावातील जमीन बल्क ड्रग पार्कसाठी अधिग्रहित करण्यात येणार असून महसूल खात्याने याबाबत अधिसूचना जाहीर करून सर्व खातेदारांना वैयक्तिक नोटीसा बजाविण्याचे काम सुरू केले आहे. जमीन अधिग्रहित करताना त्याचा मोबदला किती देणार.गावांचे पुनर्वसन करणार का आहेत त्याच ठिकाणी गावे राहणार?
 
ज्यांच्या जमिनी अधिग्रहण करणार आहेत त्यांच्या रोजगाराचे काय. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळी समाज राहत असून त्यांच्या मासेमारी व्यवसायावर गदा येणार आहे.त्यांच्या रोजगाराचे काय. प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण. अशा अनेक प्रश्नांबाबत स्थानिक जनता संभ्रमात आहे.
 
शासकीय कर्मचारी वर्गाकडून केवळ नोटीसा दिल्या जात आहेत.पण प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती स्थानिकांना दिली जात नसल्याने येथील नागरिकांमध्ये शासनाच्या विरोधात प्रचंड रोष दिसून येत असून प्रकल्प नको अशी भूमिका न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील बहुतांश नागरिकांनी घेतली आहे.