पतसंस्थांच्या कर्जदारांसाठी कर्ज हप्ते वाढ योजना

By Raigad Times    21-Nov-2020
Total Views |
patsanstha_1  H
 
अ‍ॅड. जे.टी. पाटील यांची माहिती : योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
 
अलिबाग । कोविडमुळे नियामक मंडळांनी पतसंस्थांच्या कर्जदारांसाठी कर्ज हप्ते वाढवुन देण्याची योजना आणली आहे. अल्पमुदतीचे कर्जदार आणि नियमित कर्ज फेडणारे कर्जदार आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थाचा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जे.टी. पाटील यांनी केले.
 
67 व्या राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्य अलिबाग येथे बॅ.अंतुले भुवन येथे तालुक्यांतील सहकारी पतसंस्थासाठी आयोजित संचालक, पदाधिकार्‍यांसाठी चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
 
यावेळी व्यासपीठावर महासंघाचे उपाध्यक्ष दिलीप जोशी, सचिव योगेश मगर, तालुका सहाय्यक निबंधक अशोक मोरे, नेटविन चे मार्केटिंग मॅनेजर जगदिश सुर्यवंशी, सहकार भारती चे जिल्हा संघटक दिलीप पटेल, महासंघाचे संचालक संजय वानखेडे, जगदीश कवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
आपल्या भाषणात अ‍ॅड. पाटील म्हणाले की, नियामक मंडळाने जाहीर केलेली योजना सक्तीची नसुन सदरहू योजनेत केवळ 31 मार्च 2020 रोजी जे कर्जदार थकबाकीदार नाहीत अशांनाच त्याचा लाभ होणार आहे. दीर्घ मुदत कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करत पतसंस्थांकडे नियामक मंडळाच्या नियमान्वये सहाय्यक निबंधकांतर्फे अंशदानाची मागणी झाली तरी अंशदान भरण्याची घाई करू नये याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
या चर्चासत्रात सहाय्यक निबंधक अशोक मोरे यांनी, महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मध्ये कार्यान्वित करून सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत. अलिकडील कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर संचालकांना लाभांश वितरीत करण्याचे अधिकार प्रदान केले असल्याचे सांगितले. तर नेटविनचे मार्केटिंग मॅनेजर जगदिश सुर्यवंशी यांनी स्पर्धेच्या युगात पतसंस्थांच्या दैनंदिन व्यवहारात संगणकीकरणाचे अनन्य साधारण महत्व असून बँकांप्रमाणेच ग्राहकांना तप्तर सेवा देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
 
जिल्हा महासंघाचे सचिव योगेश मगर यांनी कोविड च्या महामारीमुळे पतसंस्थांच्या अडी अडचणी वाढल्या असुन थकबाकी वसुलीसाठी सहकार खात्याने सहकार्य करावे अशी मागणी केली. या चर्चासत्रात अलिबाग तालुक्यांतील पतसंस्थांच्या पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्यांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली होती. 67 व्या सहकार सप्ताहाची सुरुवात सहकार ध्वजाचे ध्वजवंदनाने झाली. दिलीप जोशी यांनी सहकार गीत गायले तर संचालक जगदिश कवळे यांनी आभार प्रर्दशन केले.