शिक्षकांच्या कोरोना चाचणीबाबत संभ्रम आणि सावळागोंधळ!

By Raigad Times    21-Nov-2020
Total Views |
teachers corona test_1&nb
 
चाचणी केंद्रांवर गर्दी, नियोजनाचा अभाव
 
धम्मशील सावंत/पाली-बेणसे । कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी, खबरदारी म्हणून मागील 8 महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मात्र येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांना कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र यात संभ्रम आणि सावळागोंधळ सुरु आहे.
 
कोरोना चाचणी केंद्रावर होत असलेली गर्दी, नियोजनाचा अभाव, काही ठिकाणी फक्त अनुदानित शाळांतील शिक्षकांनाच मोफत चाचणी करुन देण्याचे आदेश व तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यातील शिक्षकांची चाचणी न करणे अशा अनेक गोष्टींमुळे हा संभ्रम व सावळागोंधळ कारभार निर्माण झाला आहे.
 
पनवेल महानगर पालिकेने तर फक्त अनुदानित शाळांची मोफत आरटी-पीसीआर चाचणी उपजिल्हा व महानगरपालिका रुग्णालयात होईल, असे सांगितले आहे. विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व स्वयंम अर्थसहाय्य शाळांनी त्यांच्या शिक्षकांच्या चाचण्या स्वतः करुन घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
 
गुरुवारी (19 नोव्हेंबर) कर्जत येथे चाचणी केंद्रावर प्रचंड गर्दी व गोंधळ उडाला होता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचादेखील विसर पडला होता. काही ठिकाणी दुसर्‍या तालुक्यात राहणार्‍या शिक्षकांना त्यांची शाळा असलेल्या तालुक्यात चाचणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या शिक्षकांची गैरसोय झाली आहे.
 
पहिली ते आठवीच्या शिक्षकांनाही ही चाचणी 22 तारखेपर्यंत करणे सक्तीचे केल्याने चाचणी केंद्रावर आणखी गर्दी होत आहे. हे शिक्षक सध्या ऑनलाईन शिकवत आहेत. त्यामुळे या शिक्षकांची चाचणी नंतर केली असती तर गोंधळ टाळता आला असता. मात्र याबाबत स्थानिक प्रशासन मुख्य अप्पर सचिव यांच्या पत्रानुसार कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
गोंधळात गोंधळ...
शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे की, शाळा सुरु करणे व विद्यार्थी शाळेत पाठविणे बंधनकारक नाही. मात्र शिक्षकांनी शाळेत जाणे आवश्यक आहे. याबरोबरच जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे. यामुळे गोंधळ अधिकच वाढला आहे. 
 
---------------------------------------------------------
तालुक्याबाहेर राहणार्‍या शिक्षकांची मोठी गैरसोय झाली आहे. याबरोबरच हे सर्व नियोजन योग्य प्रकारे करणे आवश्यक होते.
- कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते-पाली
---------------------------------------------------------
 
मुळात सरकट सर्व शिक्षकांची चाचणी मोफत करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षक संख्या जास्त असलेल्या शाळेतच चाचणी घेण्याची व्यवस्था केली पाहिजे होती. चाचणी केंद्रावर सोशल डिस्टंन्सिंग व नियोजन पाळणे आवश्यक आहे.
- दिपक घोसाळकर, शिक्षकेत्तर कर्मचारी
---------------------------------------------------------