अलिबाग । यंदा आवासची नागोबा देवस्थानची जत्रा रद्द

By Raigad Times    21-Nov-2020
Total Views |
file photo_1  H
  • कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय
  • दोन दिवस मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणार
 अलिबाग । अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध आवास येथील श्री नागोबा देवस्थानची जत्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 27 आणि 28 नोव्हेंबर असे दोन दिवस येथील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
 
file photo_1  H
 
आवास येथील श्री नागोबा देवस्थानच्या जत्रेने अलिबाग तालुक्यातील जत्रांना सुरुवात होते. या जत्रेला केवळ रायगड जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील भाविक हजेरी लावतात. त्यामुळे लाखोंची उलाढाल होत असते. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने आवासची जत्रा रद्द करण्यात आली आहे.
 
जत्रा रद्द करण्यात आली असली तरी, 27 आणि 28 नोव्हेंबर असे दोन दिवस येथील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. दोन दिवस आधी गण खेळण्याचा कार्यक्रम होणार आहे. देवाची विधीवत पूजा आणि पालखी हे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडणार असल्याची माहिती आवास ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत राणे यांनी दिली.
 
कोरोना महामारीचा धोका कायम आहे. तसेच लेप्टोस्पायरोसिसची साथ सुरु आहे. अशा परिस्थितीत या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात येणार आहे. तसेच मास्क लावलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचेही सरपंच राणे यांनी सांगितले.
 
दरम्यान, आवासपाठोपाठ कणकेश्‍वर, वरसोली येथील विठोबा देवस्थान व चौल येथील दत्ताच्या जत्रेवरही कोरोनाचे सावट आहे.
“श्री नागोबा देवस्थान आवास येथील 27 व 28 नोव्हेंबरला होणारी जत्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र भाविकांना मास्कचा वापर करुन दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाईल. याची सर्व भाविक आणि दुकानदारांनी नोंद घ्यावी.-                            अभिजीत राणे, सरंपच, ग्रामपंचायत आवास”