मुरुड : काशिद समुद्रात बुडणार्‍या 9 पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचविले

By Raigad Times    20-Nov-2020
Total Views |
Murud 2_1  H x
 
पंधरा दिवसांतील दुसरी घटना
 
मुरुड । मुरुडमधील प्रसिद्ध काशिद समुद्रात बुडणार्‍या 9 पर्यटकांना येथील जीवरक्षकांनी जीवनदान दिले. पुण्याहून हे पर्यटक येथे फिरायला आले होते. समुद्रात पोहायला उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. मात्र वेळीच मदतीसाठी धावून आलेल्या जीवरक्षकांमुळे त्यांचा जीव वाचला. गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे.

Murud kashid beach_1  
 
‘मिनी गोवा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुडच्या काशिद समुद्र किनार्‍यावर देश-विदेशातून पर्यटक हजेरी लावतात. तर मुंबई, पुणेकर पर्यटकांचे हे आवडते पर्यटनस्थळ असल्याने विकेंडला येथे गर्दी असते. मात्र पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे काशिद समुद्र किनार्‍यावर दुर्घटनांचे प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. मात्र तरीही या घटनांकडे आणि सुरक्षेच्या उपायांकडे पर्यटकांकडून दुर्लक्ष केले जाते.
 
आज पुन्हा 9 पर्यटक बालंबाल बचावले आहेत. पुण्यातील नामांकित टी.टी.एस. कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करणारे सत्यम कुमार (वय 21), सुमित बोरकर (वय 20), अनिरुद्ध गायकवाड (वय 20), नीरज कुमार (वय 24), स्वाती लोणकर (वय 19) असा पाच जणांचा ग्रुप तसेच पिंपरी चिंचवड येथील कुमारी परिसिला गुप्ता (वय 15) या विद्यार्थिनीसह त्यांच्या परिवारातील इतर 3 सदस्य कोकण पर्यटनासाठी आले होते.
 
आज (20 नोव्हेंबर) सकाळी ते काशिद समुद्र किनार्‍यावर फिरायला आले. मात्र येथे त्यांना समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही आणि ते पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. त्यांचा आवाज ऐकून रोहन खोपकर वॉटर स्पोर्ट्स व अ‍ॅडव्हेंचर्सचे लाईफगार्ड भावेश भोईर, संजय वाघमारे, निखिल शिंदे, राकेश वाघमारे यांनी यांनी त्यांच्या स्पीड बोटीच्या सहाय्याने या पर्यटकांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
 
या घटनेबाबत काशिद ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष राणे यांनी सांगितले की, पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही. किनार्‍यालगत पोहणे आवश्यक असताना उत्साहाच्या भरात खोल पाण्यात ते ओढले जातात. आज जीवरक्षक व स्पीड बोटीमुळे पर्यटकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, जीवदान मिळालेल्या सत्यम कुमार व त्यांच्या ग्रुपने तसेच गुप्ता परिवाराने काशिद बीच वॉटर स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांचे व रोहन खोपकर यांच्या संपूर्ण वॉटर स्पोर्ट्स टीमचे आभार मानले.
----------------------------------------------------------------------------------------- 
पंधरा दिवसांतील दुसरी घटना
 
काशिद समुद्रात बुडणार्‍या पर्यटकांना वाचविण्याची ही गेल्या पंधरा दिवसांतील दुसरी घटना आहे. याआधी 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी काशिद समुद्रात बुडणार्‍या दोन पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचविले होते. आज दुसर्‍यांदा समुद्रात बुडणार्‍या 9 पर्यटकांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे.