कोरोनातून तेजाकडे...! चक्रीवादळातून पूर्वपदाकडे!

By Raigad Times    20-Nov-2020
Total Views |
Diwali Article Photo_1&nb
 
सोन पावलाने दिवाळी आली...दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण...तिमिरातून तेजाकडे...अंधारातून प्रकाशाकडे असे आपण म्हणतो...यंदा यात थोडा बदल करुन कोरोनातून कोराना मुक्तीकडे, निरोगी आरोग्याकडे असे म्हणू शकतो. संपूर्ण जग ठप्प करणार्‍या या महारोगामुळे सृष्टीवर अंधारच पसरला होता. गेले आठ महिने पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने कोरोनाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम भोगले आहे. प्रत्येकाचा एकतरी जवळचा माणूस कोरोनाने हिरावून घेतला आहे. हे कमी की काय, म्हणून चक्रीवादळही यंदाच प्रकटले. त्यामुळे कोकणवासियांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागला.
 
माणसाला सर्वच पातळ्यांवर उलटापालट करणारे हे वर्ष ठरले. आपल्या देशात वर्षभरात किती तरी सण साजरे होतात. मरगळणार्‍या मनाला उभारी देण्याचे आणि उत्साहाची अनामिक लहर निर्माण करण्याचे काम या सणांमधून होत असते. ते सण देखील यंदा ‘सुतकी’ साजरे झाले. रस्त्यावर यायला माणूस घाबरत होता. लाखो असे लोक आहेत ज्यांनी किमान सहा महिने घराच्या बाहेर पाऊलदेखील ठेवले नाही. कामधंदे बंद पडल्यामुळे उपाशी राहणार्‍यांची संख्या ही कितीतरी पटीने आहे. अशा या अंधारमय वातावरणातून आता कुठे जग हळूहळू बाहेर येऊ लागले आहे.
 
पानगळ झाल्यानंतर वसंतात जसा झाडांना हळूहळू बहर यावा... उद्ध्वस्त झालेल्या रानाकडे पाहत एखाद्या रोपट्याने जगण्याचा प्रयत्न करावा...अगदी तसेच काहीसे सध्या माणसाबाबत घडत आहे. एका मोेठ्या संकटातून वाचल्यामुळे जणू पुनर्जन्म झाल्यागत माणूस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे जग होते तसेच आहे. तरीही कोरोनानंतर नवीन दुनियेत पाऊल टाकत असल्याचा आभास प्रत्येकाला होत आहे. कोरोनावर लस आलेली नाही. त्यामुळे संकट अजून टळलेले नाही; पण तरीही परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
 
कोरोनाच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. जणू अटी-शर्ती बघूनच हा आजार आघात करतो, हे लोकांना कळून चुकले आहे. ज्यांना दुर्धर आजार आहेत, ज्यांची इम्युनिटी पॉवर विक आहे, त्यांच्यासाठी कोरोना शाप आहे. जे या आजाराकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांची फुप्फुसे कोरोना निकामी करत आहे. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना कोरोनाचा संसर्ग होतो, असेही नाही. याची पुरेपूर खात्री झाल्यानंतर सरकारने ’अनलॉक’ची प्रक्रिया सुरु केली आहे. एक एक निर्बंध उठवण्यास सुरुवात केली आहे.
 
रस्त्यांवर गर्दी दिसत आहे. दिवाळीसाठी रस्त्यांवर झालेल्या गर्दीत जर कोरोना सापडला तर चिरडून मरेल, असे गंमतीने म्हटले जाते. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे राज्य सरकार सांगत आहे. तसे घडू नये; पण लोक आता ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. आणखी घरी बसणे शक्यही नाही. त्यामुळे कोरोनाने नंतर मरु, आधी घरात बसून उपाशी मरायला नको, हा विचार करुन लोकंही बाहेर पडू लागली आहेत. घराबाहेर पडला आहातच, तर ठिक आहे; पण सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करु नका. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष कुठल्याही परिस्थितीत करु नका!
चक्रीवादळातून पूर्वपदाकडे!
 
कोरोनामध्ये सर्वांत जास्त त्रास कोकणाला झाला. मुंबई आणि पुणे ही दोन मोठी शहरे जवळ तसेच औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विशेषतः रायगडमध्ये कोरोना रुग्ण संख्या रोज नवीन उच्चांक गाठत होती. अशात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी घरामध्ये बसलेल्या रायगड आणि रत्नागिरीकरांना चक्रीवादळाने अक्षरशः उघड्यावर आणले. गेल्या दीडशे वर्षांत झाले नाही, इतक्या तुफानी चक्रीवादळाने लोकांना जबर झटका दिला. हजारो लोकांची घरेदारे नष्ट झाली. बाजती झाले उन्मळून पडली. सरकारने मदत करुन घरांवर छप्पर देण्याचा प्रयत्न केला...पण झांडाचे काय?
 
कोकणातील नागरिकांच्या अर्थकारणात आणि चरितार्थ भागवण्यात फळबागांचा मोठा हातभार असतो; किंबहूना आंबा, फणस, काजू, नारळ, फोफळी अशा आणखी कितीतरी फळझाडांवर इथला माणसू पोट भरत असतो. वर्षाच्या नियोजनात या फळझाडांचा मोठा हातभार असतो. वादळात कोसळलेली झाडं सगळ्यांनीच पाहिली; पण कोकणाची मोडून पडलेली अर्थव्यवस्था अन्य कोणाला दिसण्याचे कारण नाही. आँसू पी कर जीनेवाले लोग...कोकणात राहतात. त्यामुळे त्यांचे अश्रू कोणाला दिसण्याचे कारण नाही. स्वतःहून पुढे येऊन मदत कोणी करेल, अशी अपेक्षा नाही.
 
मार्चमध्ये कोरोना, जूनमध्ये चक्रीवादळ आणि ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस...तिहेरी फटका खाल्ल्यानंतरही कोकणी माणूस उभा आहे. आराडाओरड नाही की सरकारच्या नावाने शिमगा नाही. गप्प गुमान कामाला लागलेला दिसतो. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये दिवाळी साजरी होत असताना कोकणातील शेतकरी शेतात राबताना दिसतो. वर्षभर मेहनत करुन शेतात पिकवलेले धान्य घरी नेण्यासाठी झुंजताना दिसतो. दरवर्षीचे हे कोकणातील चित्र, थोडे विचित्र; पण तरी दिलासादायक असते.
रानातून आणलेले भाताचे भारे किंवा नाचणीची कणसे घरातील कोपर्‍यात किंवा अंगणात रचली जातात...प्रत्यक्षात यातील धान्य घरात किती जाईल? याचा अंदाज नसतो; परंतू या काळातील शेतकर्‍यांच्या घरातील आनंद दिवाळीपेक्षाही कमी नसतो. कोरोनाच्या काळात ज्यांनी तारलं त्या शेतकर्‍याला पुढे निसर्ग वादळाने मारलं...या आपत्तीतून समस्त कोकणवासियांना पुन्हा उभारी मिळो...आणि विस्कटलेली घडी पुढच्या दिवाळीपर्यंत पूर्वपदावर येवो, या शुभेच्छा!
                                                                                                                                                 -  
राजन वेलकर,
अलिबाग