राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार

By Raigad Times    19-Nov-2020
Total Views |
gram panchayat nivadnuk_1
यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची घोषणा
 
मुंबई : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
 
मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या.
 
विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे.
 
परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.