26 नोव्हेंबरला भारत बंद; शेतकरी संघटनांचे आयोजन

By Raigad Times    19-Nov-2020
Total Views |
shekap_1  H x W
 
कृषी बिलविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
 
अलिबाग । केंद्रीय कृषी बिलविरोधात शेकापक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्राच्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
 
शेकापच्या जिल्हा चिटणीस मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना, केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट रचला असून तो कदापी यशस्वी होऊ देता कामा नये, असा निर्धार आ. जयंत पाटील यांनी यांनी व्यक्त केला. यासाठी 26 नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या कायद्यातील तरतूदी अतिशय भयानक आहेत. सिलींग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
 
शेतकर्‍यांच्या पिकाला हमी भाव दिला जाणार नाही. महत्वाचा भाग असणारे कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्याचा घाट देखील केंद्राने घातला आहे. या प्रश्नांप्रमाणेच निसर्ग चक्रिवादळात झालेले नुकसान अजूनही भरुन देण्यात आलेले नाहीत. कित्येक नुकसानग्रस्त मदतीपासून वंचितच आहेत. झाडनिहाय मदत देतानाही अतिशय अन्याय करण्यात आला आहे. कोरोनामुळे ओढवलेली भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आर्थीक मदत देण्याची गरज आहे.
 
छोट्या मोठ्या उद्योगांना सरकारने मदत रण्याची गरज आहे. या काळात आलेले भरमसाठी विज बिल पूर्णपणे माफ केलेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनाही पुरेशी नुकसान भरपाई दिलेली नसल्याकडेही आ. जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. योग्य पंचनामे करण्यात आलेले नाहीत. जिल्हयात आरोग्य सेवा योग्य नसल्याने अनेकांचे जीव जात असल्याने ही सेवा सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 
रोहा तालुक्यातील प्रस्तावित औद्यौगिक कारणांसाठी जमिन खरेदीबाबतही जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक भुमिपूत्रांना उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात शेकाप ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावागावात बैठका घेऊन वातावरण निर्मिती करण्याचे आवाहन करुन प्रत्येक गाडीवर लाल बावटा फडकवत या मोर्चात सहभागी होण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
 
यावेळी आ. बाळाराम पाटील, माजी आमदार पडित पाटील, माजी आमदार धैर्यशिल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, औरंगाबादचे जिल्हा चिटणीस काका शिंदे, जिल्हा परिषदेेचे अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड. निलीमा पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, माजी सभापती प्रमोद पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, अ‍ॅड. प्रसाद पाटील, राजिम बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्यासह सर्व तालुका चिटणीस, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.