रायगड : वृद्ध महिलेची डोक्यात दगड घालून हत्या

By Raigad Times    19-Nov-2020
Total Views |
Navi Mumbai_1  
 
अंगावरील दागिन्यांचीही चोरी
खुनी 48 तासांत गजाआड
 
हर्षल भादाणे/नवी मुंबई । कपडे धुवायला गेलेल्या वृद्ध महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करत, अंगावरील दागिन्यांची चोरी केल्याची घटना तळोजातील नागझरी गावालगत घडली होती. याप्रकरणी पनवेल गुन्हे शाखा युनिट-2 ने खुनीला 48 तासांत गजाआड केले आहे. तो मूळचा नेपाळचा असून, भंगाराचा व्यवसाय करायचा.
 
15 नोव्हेंबर रोजी तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील नागझरी गावालगत असलेल्या खदानीमध्ये सकाळी 7.30 ते 8.30 सुमारास ही घटना घडली होती. नागझरी गावातील 65 वर्षीय शकुंतला ठाकूर या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली होती. हत्या करतेवेळी शकुंतला ठाकूर यांच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातल्यांचीही जबरी चोरी करण्यात आली होती.
 
याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञातावर हत्या व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवी मुंबई पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील, सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मागर्दशनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे त्यांनी समांतर तपास सुरू केला. याचदरम्यान गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार कौशल्यपूर्ण तपास करुन 48 तासात खुनीला गजाआड करण्यात आले.
 
विजयकुमार मुनेश्वर मंडल (वय 30, मूळ रा. नेपाळ) असे त्याचे नाव असून, त्याला पनवेल गुन्हे शाखा युनिट-2 ने अटक केली आहे. वियजकुमार गेल्या दहा वर्षांपासून तळोजा परिसरात भंगार गोळा करुन विक्री करण्याचा व्यवसाय करायचा. पंधरा दिवसांपूर्वी शकुंतला ठाकूर या खदानीमध्ये कपडे धुवत असताना, विजयकुमार हा तेथे आंघोळ करीत होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. शकुंतला यांनी विजयकुमारला शिवीगाळ करुन दगड मारला होता. त्याचा राग मनात धरुन त्याने शंकुतला ठाकूर यांच्यावर पाळत ठेवून त्यांना एकटे गाठले आणि अंगावरील दागिने जबरीने चोरुन डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली.
 
पनवेल गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश कराड, प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, शरद ढोले, पोलीस हवालदार साळुंखे, रणजित पाटील, भोपी, पाटील यांनी 48 तासांत हा गुन्हा उघडकीस आणला.