कोकण रेल्वे मार्गावर धावत्या रो रो रेल्वेतून ट्रक बाहेर फेकला गेला; चालकाने मारली उडी आणि त्यानंतर…

By Raigad Times    18-Nov-2020
Total Views |
truck accident_1 &nb
 
रत्नागिरी । कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रो रो रेल्वेतून ट्रक बाहेर फेकला जाण्याची घटना घडली आहे. दिवाण खावटी ते खेड दरम्यान मध्यरात्री ही घटना घडली. धावत्या रो रो रेल्वेतून ट्रक बाहेर पडण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी, असं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही रेल्वे दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 
कोलाडहून केरळला लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रक दिवाण खावटीजवळ सुकिवली नदीच्या वळणावर रेल्वेगाडीवरून फेकला गेला. ट्रकमधील साहित्य एका बाजूला सरकल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
 
ट्रकचालक वसीम याकूब शेख याने वेळीच बाहेर उडी मारल्याने बचावला. पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर साडेचार वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. तुतारी एक्सप्रेस आणि कोकण कन्याया दोन गाड्या सुमारे दीड-दोन तास विलंबाने धावत आहेत.