दिवेआगर सुवर्ण गणेशाचे सोने उच्च न्यायालयाकडून घेण्याची कार्यवाही प्रगतीपथावर - पोलीस अधीक्षक

18 Nov 2020 18:15:57
divaagar_1  H x
 
अभय पाटील/ बोर्ली पंचतन । दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाचे सोने उच्च न्यायालयाच्या ताब्यात असून ते सोने जिल्हाधिकारी यांचेकडे मिळणेसाठी प्रशासकीय कार्यवाही प्रगतीपथावर आहे पुढील काही दिवसांत हे सोने ताब्यात मिळेल अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. पदभार घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक अशोक दुधे श्रीवर्धन तालुक्याच्या दौर्‍यावर असताना बोलत होते.
 
पोलीस कार्यलयीन भेटीच्या निमित्ताने बोर्ली पंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्याला त्यांनी भेट देऊन तेथील इमारत व कामकाजाची पहाणी केली.त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी माझा वैयक्तिक मोबाईल नंबर जनतेपर्यंत पोहचविला आहे नेहमी जनतेच्या समस्येबाबत मला कॉल येतात मी स्वतः त्यांना याबाबत उत्तर देत आहे. असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, रायगड जिल्ह्याच्या सीमेवर मुंबई, नविमुंबई, ठाणे, रत्नागिरी जिल्हे आहेत या भागातून गुन्हे प्रवृत्तीची लोक येऊन गुन्हे करीत असतात त्यांना आळा बसविण्यासाठी जनतेचा सहभाग वाढविणे, पोलीस गस्त कशा प्रकारे करावी याचा अभ्यास करणे, नाकाबंदी कडक करणे, जेणेकरून गुन्हे होणार नाहीत व झालेले गुन्हे तत्काळ निष्पन्न होऊन आरोपी लवकर ताब्यात मिळतील.
 
दिवेआगर येथील सुवर्ण गणेशावर काही वर्षांपूर्वी पडलेला रक्तरंजित दरोडा यामध्ये दरोडेखोरांनी चोरीला नेलेली सोन्याची मूर्ती तपासानंतर दरोडेखोरांना अटक करून त्यांच्या कडून हस्तगत केलेले मूर्तीचे सोने सध्या उच्च न्यायालयाच्या ताब्यात असून हे सोने प्रथम रायगड जिल्हाधिकारी यांचेकडे मिळण्यासाठी उच्च न्यायलामध्ये प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याबाबत प्रशासकीय काम करण्यासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0