
नवी मुंबई । कोकण विभागातील पात्रता धारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण विभाग, मुलुंड, मुंबई येथे विभागीय स्तरावर दि. 14 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विशेष पंधरवडा राबाविण्यात येणार आहे. असे विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण विभाग यांनी कळविले आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय अथवा स्वंयसेवी बालगृहात दाखल होणा-या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत. यामुळे अनाथ मुलांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. शासनाच्या दि.6 जून 2016 च्या निर्णयानुसार बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत राज्यातील मान्यताप्राप्त (अनुदानित व विनाअनुदानित) संस्थामध्ये दाखल असलेल्या व शासन निर्णयातील निकष पूर्ण करणा-या संस्थेतील अनाथ मुलांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे.
शासन निर्णयातील निकष पुढीलप्रमाणे 1) आई- वडीलांचा शोध घेऊन त्यापैकी कोणी हयात नसल्याबाबतची खात्री संबंधित यंत्रणेस झाली असणे व त्याबाबतचे अधिक्षक यांचे प्रमाणपत्र जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रमाणित करावे. 2) संबंधित जिल्हयाच्या बाल कल्याण समितीने सदर लाभार्थ्यांचे आई-वडील हयात नसल्याचे व लाभार्थी अनाथ असल्याचे चौकशी अंती प्रमाणित करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी बाल कल्याण समितीने जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश निर्गम रजिस्टरचा दाखला यापैकी एक ग्राह्य धरावे. 3) वरील निकष पूर्ण करणारे मुल ज्या संस्थेत आहे त्या संस्थेच्या अधिक्षकांनी अनाथ प्रमाणपत्र बाबतचा प्रस्ताव संबंधित जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावा. 4) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सदर प्रस्तावाची छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव स्वंयस्पष्ट शिफारस करून विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास कोकण विभाग, मुलूंड (प.) मुंबई या कार्यालयाकडे पाठवण्यात यावे.
कोकण विभागातील वरील निकष पूर्ण करणार्या पात्रता धारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण विभाग, मुलुंड, मुंबई येथे विभागीय स्तरावर दि. 14 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विशेष पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा पंधरवडा यशस्वीपणे राबविण्याकरीता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा जिल्हा व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती, बालकांच्या काळजीसाठी कार्यरत असलेल्या संस्थांचे अधिक्षक व इतर सर्व संबंधित यांना माहिती होण्याकरिता तसेच अनाथ प्रमाणपत्रासंबंधीचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी संबंधित जिल्हयांनी विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण विभाग, मुलुंड मुंबई या कार्यालयात संपर्क साधावा, असे उपआयुक्त, महिला व बाल विकास, कोकण विभाग यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.