उरण : ओएनजीसी कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांची अवहेलना!

By Raigad Times    10-Nov-2020
Total Views |
Minister Subhash Desai_1&
 
माजी आमदार मनोहर भोईर यांनी वेधले उद्योगमंत्र्यांचे लक्ष
 
अलिबाग । उरणमधील ओएनजीसी कंपनी व्यवस्थापनाकडून प्रकल्पग्रस्तांची सातत्याने अवहेलना केली जात असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, माजी आमदार मनोहर भोईर यांनी याकडे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे लक्ष वेधले आहे.
 
ओएनजीसीच्या उरण प्रकल्पामधील विविध समस्या व मागण्यांबाबत आज (10 नोव्हेंबर) उद्योगमंत्री देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. यावेळी उरणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी ओएनजीसी प्रकल्पामधून प्रकल्पग्रस्तांची सातत्याने अवहेलना होत असल्याचे सांगितले.
 
याबाबत ना. सुभाष देसाई यांनी संबंधीत अधिकार्‍यांना विचारले असता त्यावर हे अधिकारी निरुत्तर झाले. हा फक्त प्रकल्पग्रस्तांचा अपमान नाही तर महाराष्ट्र शासनाचा अपमान आहे, असे बजावत ना.देसाई यांनी याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांना तातडीने कळविले जाईल, असेही स्पष्ट केले.

Minister Subhash Desai_1& 
 
प्रकल्पामध्ये उपलब्ध होणार्‍या कायम तसेच तात्पुरत्या नोकर्‍यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना 80 टक्के प्राधान्य देण्यात यावे व सीएसआर फंड प्रकल्पबाधित क्षेत्रात वापरण्यात यावा, अशी मागणीही मनोहर भोईर यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली आहे.
 
मनोहर भोईर यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्‍नावर, लवकरात लवकर तातडीने प्लांट हेड, जिल्हाधिकरी रायगड यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करुन त्वरित मार्ग काढावा, असेही उद्योगमंत्री देसाई यांनी ओएनजीसीच्या उपस्थित अधिकार्‍यांना सांगितले.
 
यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, ओएनजीसी कंपनीचे एचआर मॅनेजर केरकटा, तसेच इतर अधिकारी, विभागप्रमुख एस.के.पुरो, नागांव सरपंच मोहन काठे, म्हातवली सरपंच अनंत घरत, वरिष्ठ पत्रकार प्रविण पुरो, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आदी उपस्थित होते.