मुरुड : लक्ष्मीखार येथे घराला आग; घराचे मोठे नुकसान

10 Nov 2020 20:39:37
murud aag_1  H
 
दोन तासांनी आग नियंत्रणात आणण्यात यश
 
सुधीर नाझरे/मुरुड-जंजिरा । मुरुड शहरातील लक्ष्मीखार येथील काशिनाथ महादेव बैकर यांच्या राहत्या घराला आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घराच्या छपरासह माळ्यावरील लाकडी फळ्यांनी पेट घेतल्याने, या आगीत असंख्य जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.
 
घराला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर, बैकर कुटुंबियांनी शेजारी राहणार्‍या लोकांना जागे करत, मदत मागितली. शेजार्‍यांनी प्रसंगावधान राखत, घरातील पाण्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. या परिसरात घरे जवळजवळ असल्याने, इतर घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडण्याची भीती होती. मात्र वेळीच आग नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला. या गडबडीत काही जागरुक नागरिकांनी सर्वप्रथम गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी हानी टळली.
 
लक्ष्मीखार भागातील धनंजय नाक्ती, संकेत म्हात्रे, हृतिक म्हात्रे, सागर पाटील, अमोल माळी, महेंद्र नाक्ती, सुशांत म्हात्रे यांनी याकरिता मोठे सहकार्य केले. या आगीमध्ये घराचे छप्पर, मांडणी, कपडालत्त्यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकलेले नाही.
Powered By Sangraha 9.0