एका दिवसांत पकडले 27 वीज चोर आणि 55 हजार युनिटची वीज चोरी

By Raigad Times    10-Nov-2020
Total Views |
uran news_1  H
 
उरण उपविभागात महावितरणची धडक कारवाई
 
अनंत नारंगीकर/जेएनपीटी । दिवसेंदिवस वाढत चाललेली वीज गळती रोखण्यासाठी महावितरणने वीजचोरांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. उरण उपविभागातील जसखार कक्षामध्ये एका दिवसात 27 वीज चोर आणि 55 हजार युनिटची वीज चोरी पकडण्यात आली आहे.
 
नवी मुंबईचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधिक्षक अभियंता राजाराम माने यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता माणिक राठोड आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंढे आणि वीज चोरी प्रतिबंधात्मक पथकाने ही कारवाई केली. जसखार कक्षाच्या हद्दीतील वीज चोरांकडून मीटरमध्ये फेरफार करुन तसेच इतर क्लुप्त्या वापरुन ही वीजचोरी करण्यात येत होती. या वीज चोरांनी महावितरणची 55 हजार युनिटची अंदाजे 10 लाख रुपयांची वीज चोरी केली असल्याचे उघड झाले आहे.
 
या वीज चोरांवर विद्युत कायदा 2003 नुसार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. उरण उपविभागात अशाप्रकारे सर्व ठिकाणी वीजचोरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जे ग्राहक नियमित वीज भरत नाहीत, अशा थकबाकीदार ग्राहकांवरही महावितरण कारवाई करणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी थकबाकी भरुन
 
महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंढे यांनी केले आहे.
दरम्यान, दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.