
कायदेशीर अडचण असल्यास ‘या’ भ्रमणध्वनी क्रमांकावर साधा संपर्क
पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे रायगडकरांना आवाहन
अलिबाग । रायगडचे नवे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पर्यटन जिल्हा असलेल्या रायगडच्या सागरी सुरक्षेवर भर देणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर कायदेशीर अडचण असल्यास वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर थेट संपर्क साधण्याचे आवाहनही रायगडकरांना केले आहे.
7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य शासनानेे बदलीने पदस्थापन करण्याचे आदेश केले. त्यानुसार रायगडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी गुरुवारी (8 ऑक्टोबर) पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडून जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. अशोक दुधे यांनी यापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील पनवेल विभाग-2 या ठिकाणी पोलीस उपआयुक्त म्हणून यशस्वीरित्या काम पहिले आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अशोक दुधे यांनी रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटकांची सुरक्षितता, महिला व बालकांची सुरक्षितता त्याचप्रमाणे रायगड जिल्हा हा सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील असल्याने जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेवर भर देणार असल्याचे सांगितले.
तसेच कोणत्याही नागरिकांस काही कायदेशीर अडचण असल्यास आपल्या 9870562001 या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. त्यांच्या अडचणीचे योग्य ते कायदेशीर निराकरण केले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी रायगडच्या जनतेला केले आहे.