अलिबाग : वरंडेचा लाचखोर तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

By Raigad Times    26-Oct-2020
Total Views |
STOP Corruption_1 &n
 
  • सुधारित सातबारा देण्यासाठी स्वीकारली अडिच हजारांची लाच
  • रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
अलिबाग । सुधारित सातबारा देण्यासाठी अडिच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या अलिबाग तालुक्यातील वरंडे सजाचा तलाठी मनोज लक्ष्मण मुरुडकर याला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अँटी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहाथ पकडले. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
 
39 वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर अभिलेखात वारस नोंद घेऊन सुधारीत सातबारा देण्याकरिता वरंडे येथील तलाठी मनोज मुरुडकर (वय 55) याच्याकडे अर्ज केला होता. मात्र हे काम करण्यासाठी मुरुडकर याने तक्रारदाराकडे 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती अडिच हजार रुपये घेण्याचे ठरले होते.
 
याप्रकरणी तक्रारदाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज (26 ऑक्टोबर) सायंकाळी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून अडिच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मनोज मुरुडकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.
 
मुरुडकर याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक घरत, पोलीस हवालदार दिपक मोरे, पोलीस नाईक सूरज पाटील, जितेंद्र पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
 
 --------------------------------------------------------------
 
...शासकीय कामासाठी लाच मागितल्यास येथे करा तक्रार
 
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरो, रायगड येथे 02141-222331 या किंवा टोल फ्री क्र. 1064 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अधिकराव पोळ यांनी केले आहे.