खालापूरकरांचा दसरा गेला अंधारात; दहा तास वीजपुरवठा खंडीत

By Raigad Times    26-Oct-2020
Total Views |
Power Outage_1  
                                                                                                                                                         File Photo 
संदीप ओव्हाळ/खोपोली । सर्वत्र दसर्‍याचा सण उत्साहात पार पडत असताना खालापूर तालुका मात्र अंधारात चाचपडत होता. वीज वितरण कंपनीच्या मेहरबानीमुळे खालापूरकरांवर तब्बल दहा तास अंधारात काढायची वेळ आली होती.
 
कोरोना, निसर्ग चक्रीवादळ आणि यानंतर पावसाचे तांडव. हे कमी की काय म्हणून विज वितरण कंंपनीचा ढिसाळ कारभार नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. गणेशोत्सवातदेखील खालापूरात विजेचा लपंडाव सुरु होता. सोबतच अव्वाच्या सव्वा वीज बिले ग्राहकांच्या माथी मारली गेली.
 
महावितरण कार्यालय खालापूरचे बहुतांशी वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी खालापूरात राहत नाही. त्यामुळे वीज नसल्यावर नागरिकांचे काय हाल होतात? याचा अंदाज त्यांना नाही. काल दसर्‍याच्या दिवशीही (25 ऑक्टोबर) विजेचा खेळखंडोबा झाला. तब्बल दहा तास वीज गायब होती.
 
सणासुदीला वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तक्रार करायची तर रविवार असल्याने खालापूर कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हता. फोनसुद्धा बंद होते. डोक्याला हात लावून बसण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. वीज बिल वाढवले जात आहे; पण कारभारदेखील सुधारत नाही, अशी खंत खालापूरातील संतोष जाधव यांनी व्यक्त केली आहे.