माणगाव : चक्रिवादळात पडझड झालेल्या शाळांची दुरुस्ती करा - ग्रामस्थ

By Raigad Times    26-Oct-2020
Total Views |
mangoan school_1 &nb
 
रविंद्र कुवेसकर/ उतेखोल/माणगांव । निसर्ग चक्रीवादळात छप्पर उडून मोठी पडझड झालेल्या उतेखोल गावातील श्री वाकडाई होळीच्या माळावरील जिल्हा परिषदेच्या गिरीजनवाडी प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी दुरुस्त करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातली अनेक शाळांची अशाप्रकारे वाताहत झाली आहे.
 
शाळेवरील संपूर्ण पत्रे उडून लोखंडी फ्रेम मोडल्या, वाकल्या आहेत. तसेच मुसळधार पडणार्‍या पावसाने बांधकाम तुटफूट व संपूर्ण रंगहिन व आतील जमिन लाद्या जिर्ण झाल्या. शाळेचे रेकॉर्ड फाईल तसेच स्टेशनरी, प्रोजेक्टर, कपाटं, शैक्षणिक मार्गदर्शक फलक, चित्रे इत्यादी गोष्टींचे खुप मोठे नुकसान झाले आहे.
 
सध्या तात्पूरते विद्यार्थ्यांचे नुकसान टळावे व शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शनासाठी जवळील महादेव कोळी डोंगर कोळी समाज मंदिरात विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिल्याची माहीती समाज मंदिराचे अध्यक्ष अनंता थळकर यांनी दिली. जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला, आता तरी या कडे संबंधित प्रशासनाने लक्ष वेधावे कारण आता हे वर्ष संपायला दोनच महिने शिल्लक आहेत. नविन वर्षाच्या मुहुर्तावर पुनश्च हरिओम, मिशन बिगीन अगेन प्रमाणे शाळा सुरु करायचा निर्णय झालाच तर मग या ठिकाणच्या शालेय विद्यार्थ्यांना कुठे बसविणार ? असा सवाल ऐरणीवर आला आहे.
 
याबाबत, नगरसेवक जयंत बोडेरे यांना विचारले असता शाळेच्या झालेल्या नुकसानी संदर्भात पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांना माहीती दिली आहे. त्यांनी संबधित प्रशासनाचे अधिकारी यांना सूचना दिल्याचे सांगितले. तालुक्यात तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही असेच शालेय मंदिरांचे नुकसान झाले आहे.