अलिबाग : मच्छिमार बोटीवर डिझेलचा बेकायदा साठा; 5 जणांवर गुन्हे दाखल

By Raigad Times    26-Oct-2020
Total Views |
Mandwa Sagri Police Stati
 
  • मांडवा सागरी पोलिसांची छापा टाकून कारवाई
  • डिझेल, बोटीसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त
अलिबाग । मच्छिमार बोटीवर डिझेलचा बेकायदा साठा करुन ठेवणार्‍या बोडणी येथील चौघांसह पाच जणांविरोधात मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. छापा टाकून केलेल्या या कारवाईत डिझेलसह लाकडी फायबरची बोट व पंप असा सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी रायगड जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सागरी किनारी भागात अवैधरित्या चालणार्‍या व्यवसायांबाबत गुप्त बातमीदाराद्वारे माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार दसरा व देवी विसर्जन बंदोबस्तात हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी व तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर यांचे संयुक्त पथक घटनास्थळी रवाना झाले.
 
या पथकाने 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मांडवा जेट्टी परिसरातील ‘हरी ओम साई’ या मच्छिमार बोटीवर छापा टाकला. यावेळी बोटीवरील भारत लक्ष्मण कोळी (42 वर्षे), सचिन नारायण कोळी (वय 37), गणेश दत्ताराम कोळी (वय 41 वर्षे, तिघेही राहणार बोडणी, ता.अलिबाग), प्रमोद भोलई निषाद (वय 31, रा.बपवनधपुर, ता.कादीपुर, जि.सुलतानपुर उत्तरप्रदेश सध्या रा.बोडणी ता. अलिबाग) यांनी आयुब (रा.मुंबई) याच्याशी संगनमत करुन विनापरवाना 75 हजार 830 रुपये किंमतीच्या डिझेलचा साठा केल्याचे आढळून आले.
 
पुरवठा निरक्षण अधिकारी नम्रता भोयर यांच्या तक्रारीनुसार मांडवा सागरी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे 26 ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी 75 हजार 830 रुपये किंमतीचे डिझेल, 4 लाख 50 हजार रुपये किंमतीची लाकडी फायबरची बोट व 1 हजार रुपये किमतीचा पंप असा एकूण 5 लाख 26 हजार 830 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके हे करीत आहेत.
 
पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या अधिपत्याखाली अलिबागच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर, सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार श्रीराम पडवळ, पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस हवालदार प्रदीप झेमसे, पोलीस हवालदार संदेश ठाकूर, पोलीस नाईक सुधीर पाटील, पोलीस नाईक प्रशांत घरत, अव्वल कारकून श्रद्धा टेकवडे अशा संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली.