- यंदा पालखी दारासमोरुन गेली; मात्र दुरुनच घ्यावे लागले दर्शन
- कोरोनाच्या नियमांचे पालन करीत महाराजांचा पालखी सोहळा संपन्न
- पालकमंत्री-आमदारांची मंदिरात उपस्थिती
मिलिंद अष्टिवकर/रोहा । रायगड जिल्ह्याचे श्रध्दास्थान, रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आज (26 ऑक्टोबर) पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्यावतीने पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व पोलीस पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.
कोरोना नियमांचे पालन करीत आणि जिल्हाधिकारी रायगड यांनी केलेल्या सूचनांनुसार बंधूभेटी घेत केवळ चार तासांतच पालखी मंदिरात परतली. यंदा पालखी दारासमोरुन गेली मात्र भाविकांना आरती आणि स्पर्श न करताच दुरुनच दर्शन घ्यावे लागले आहेत. दरवर्षी भल्या पहाटे हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. कोरोना नियमांमुळे ती यंदा फारच अत्यल्प होती.
या सोहळ्यासाठी पहाटे मंदिरात पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी यशवंतराव माने, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कोलाटकर, कार्यवाह सचिन चाळके, नगराध्यक्ष संतोष पोटफोड़े, उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, माजी नगराध्यक्ष समिर शेडगे, लालता प्रसाद कुशवाह, संजय कोनकर, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे, सुभाष राजे, समिर सकपाळ, आनंद कुलकर्णी, महेश सरदार, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, अमित उकडे, राजेश काफरे, नगरसेवक दिवेश जैन आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या र्पाश्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा झाला असला तरी या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता, पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. तद्नंतर या वर्षी अलिबाग येथून मागविण्यात आलेल्या रथसदृश्य वाहनामध्ये महाराजांची पालखी मार्गस्त झाली. शहरातील ठरवून दिलेल्या मार्गावरील मंदिरात बंधुभेट देत महाराजांची पालखी केवळ चार तासांच्या अवधीत मंदीरात परतली. यावेळी पुन्हा महाराजांना पोलीस मनवंदना देण्यात आली.
यंदा पालखीचे जवळून दर्शन कोणाला घेता आले नसले तरी स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फुलांनी आणि सडा रांगोळ्यांनी रस्ते बहरलेले होते. श्रद्धास्थान असलेल्या श्री धाविर पालखीचे दर्शन दुरुनच घ्यावे लागल्याची वेगळी नोंद मात्र रोहेकरांच्या मनात कायम असणार आहे.