म्हसळा देवघर येथील चोरी प्रकरण : चोरलेला मुद्देमाल पुन्हा आणून ठेवला!

By Raigad Times    25-Oct-2020
Total Views |
Crime News Raigad_1 
 
पकडले जाण्याच्या भितीने चोर भांबावले
 
सुशील यादव/म्हसळा । चोरीचे पितळ उघडे पडेल आणि आपण पकडले जाऊ, या भीतीने चोरांनी चोरलेला मुद्देमाल पुन्हा घटनास्थळाजवळ आणून ठेवल्याची आश्‍चर्यजनक घटना म्हसळा देवघर येथे घडली आहे.
 
9 ऑक्टोबर रोजी म्हसळा-माणगाव-पुणे राष्ट्रीय मार्गावर देवघरनजीक लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या विचारे फॅमिली रेस्टॉरंटमध्ये भुरट्या चोरांनी घरफोडी केली होती. यामध्ये हॉटेलमधील 60 हजार रुपये किमतीचे दोन फ्रिज चोरीला गेले होते. याप्रकरणी 16 ऑक्टोबर रोजी म्हसळा पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल करुन तपास सुरु करण्यात आला होता.
 
तपास सुरु असतानाच कारवाईच्या भीतीने अज्ञात चोरांनी रेस्टॉरंटमधून चोरुन नेलेले सॅमसंग कंपनीचा 400 लिटरचा फ्रिज आणि ब्ल्यू स्टार कंपनीचा 300 लिटरचा डीप फ्रीज हे दोन्ही फ्रीज 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पुन्हा त्याच रेस्टॉरंटशेजारी असणार्‍या शांताराम शिंदे यांच्या शेतात ठेवले असल्याचे आढळले.
 
फिर्यादी विचारे यांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमालाची खात्री केली. मुद्देमाल स्थानिक पंचांसमोर ताब्यात देण्यात आला आहे. सदरचे फ्रिज चोरांनी रस्त्यापासून 150 मीटर आत चारचाकी वाहनाने आणून शेतात अलगद उचलून सुस्थितीत ठेवले असल्याचे तपासात आढळून आले आहे.
 
आपण पकडले जाऊ या भितीपोटी चोरांनी चोरुन नेलेला मुद्देमाल घटनास्थळाशेजारी आणून ठेवल्याने चर्चेला उधाण आले आहे. तर दुसरीकडे हे कृत्य नेमके कोणी केले? याचा तपास पोलीस घेतली, असा विश्‍वास फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे.