सरकारने कोकणवासियांची क्रूर चेष्टा थांबवावी

By Raigad Times    24-Oct-2020
Total Views |
konkan_1  H x W
 
राजन वेलकर/अलिबाग : चक्रीवादळाने होत्याचे नव्हते केल्यानंतर मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत…नुकसानीचे वेगवेगळ्या ‘अँगल’चे फोटो झळकत आहेत. नेत्यांचेे चेहरे पहायची इच्छा नाही…गरीबांचे उद्ध्वस्त झालेले चेहरे पाहण्याची हिंमत होत नाही…अशाही परिस्थितीत कोकणी माणूस झुंजतो आहे. पडलेले घर उभे करण्यासाठी रात्रीचा दिवस करतो आहे…घरावर छप्पर नाही आणि पाऊस पडत असेल तर त्या माणसाच्या डोक्यावर छप्पर देण्याऐवजी त्याचे पंचनामे करायचे असतात, असा उच्च विचार फक्त सरकार आणि त्यांचे उच्च विद्याविभूषित अधिकारीच करु शकतात…
 
गरीब माझा कोकणी माणूस धडपडतो आहे. संपूर्ण आयुष्यभर काबाडकष्ट करुन उभे केलेले घर फक्त आता मातीचा ढिगारा आहे. त्या ढिगार्यातून पुन्हा उभे राहण्यासाठी रात्रंदिवस तो झटतो आहे. त्याचे लक्ष आभाळाकडे आहे. ढग दाटलेले आहेत? काळे आहेत की शुभ्र आहेत? काळे असतील तर पाऊस पडणार. पडला तर किती वेळाने पडू शकतो, याचा अंदाज काढत तो घराची डागडूजी करत आहे. हातात पैसा नसताना घर उभारणीचे मोठे संकट त्यांच्यासमोर आहे…पेरणीची वेळदेखील निघून चालली आहे.
 
दुहेरी संकटात कोकणी माणूस होरपळत असताना सरकारची माणसे पंचनामे करण्यासाठी गावात पोहचली आहेत. खिशात हात घालून ‘मोठे साहेब’ गावात मिरवत आहेत. शंभर प्रश्न विचारुन आरोपीच्या पिंजर्यात उभे करत आहेत. अरे, ज्या गावांमध्ये एक घर शिल्लक नाही…वीज कधी येईल? याचा अंदाज कोणाला नाही. चार्ज करता येत नसल्याने मोबाईल बंद आहेत. सर्व प्रकारचा संपर्क तुटलेल्या अशा गावांमध्ये हे ‘बाबू’ लोक वेगवेगळ्या कागदाच्या झेरॉक्स प्रतींची मागणी करत आहेत. अनेकांकडे बँक खाती नाहीत. काही घरांचे मालक मुंबईसारख्या शहरांमध्ये अडकून पडले आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे कसे होणार? हे स्पष्ट आहे.
 
पंचनामे झाल्यानंतर सरकार मदत देईल, असे पंचमाने करायला आलेले अधिकारी सांगतात; पण त्यावर कोणाचा विश्वास नाही. याआधी सरकारने कोकणाला मदत केल्याचा अनुभव नाही. त्यामुळे ‘आपले आपल्यालाच निस्तरायचे आहे’ हे कोकणी माणूस समजून आहे. एकमेकांच्या मदतीसाठी धावत आहे. कोकणी माणूस हा बहुतांशी ‘व्यवहारशून्य’ आहे, मनाने अत्यंत साफ असल्यामुळे असेल कदाचित; परंतू तो ‘अक्कलशून्य’ नाही. त्यामुळे छप्पर उडालेल्या घरात अन्नधान्य भरायच्या आधी छप्पर उभारायला हवे, हे तो समजून आहे.
 
घरावर छप्पर असेल तर घरात माणूस सुरक्षित राहील. माणूस सुरक्षित असेल तर त्याला अन्नधान्याची आवश्यकता लागेल, हे साधे सूत्र आहे; पण सरकार अणि प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही. एसीमध्ये बसून निर्णय घेणार्या या लोकांची नाळ गरीब आणि ग्रामीण महाराष्ट्राशी तुटली असल्याचेच हे उदाहरण आहे. त्यामुळे हे लोक कधी मोफत रेशन देत असल्याच्या घोषणा करतात तर कधी रॉकेल देण्याच्या घोषणा. आभाळातून पाऊस पडत असताना चूल पेटणार कशी? दिवे लावायचे कुठे? अन्न शिजवणार कसे? खरेच साधे साधे, परंतू महत्वाचे प्रश्न कोणालाच कसे पडत नाहीत? याचे आश्चर्य वाटते.
 
चक्रीवादळानंतर दहा दिवसांत आठ आणेही देऊ न शकलेले सरकार आणि विरोधी पक्ष दोघांकडूनही फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्यांचे दौरे सुरुच राहतील; पण तोंडावर पाऊस आहे, याची जाणीव सामान्यांना आहे. खास करुन कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी गावाला गेलेले तरुण तर झपाटल्यागत काम करत आहेत. कोणी रस्ते साफ करतोय, कोणी विस्कटलेला संसार पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर कोणी विजेचे पोल उभारताना दिसत आहेत. सलाम भावांनो सगळ्यांना… आपली एकी हीच आपल्या कोकणाची ताकद आहे आणि माणुसकी आपले वैभव! स्वतःचे घर कोसळलेले असताना शेजारच्याचे छत शिवण्यासाठी धावणार्या कोकणी माणसाला मनापासून सलाम आहे.
 
(ताक : शासकीय मदतीचा धनादेश ‘खिशातून’ वाटल्याच्या तोर्यात छायाचित्र काढण्यासाठी मोठे धैर्य लागते आणि ते आपल्या नेत्यांकडे आहे.)