रायगडात साकारणार ‘औषध निर्माण उद्यान’

By Raigad Times    23-Oct-2020
Total Views |
 'Pharmaceutical Park' to
 
मुरुड व रोहा तालुक्यांतील 17 गावांतील जमिनी अधिसूचित
 
मुंबई : रायगडात ‘औषध निर्माण उद्यान’ (बल्क ड्रग पार्क) साकारणार आहे. हे औषध निर्माण उद्यान उभारण्याकरिता मुरुड व रोहा तालुक्यांमधील 17 गावांमधील एकूण 1994.969 हे.आर. क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत अधिसूचित करण्यात आली असल्याची माहिती उद्योग विभागाने दिली आहे.
 
रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णय क्र.टीपीएस 1219/150/प्र.क्र.7819/नावि.12, दि.19.1.2019 अन्वये रायगड जिल्ह्यामधील 40 गावांमधील अंदाजे 13408.473 हे.आर. जमीन एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी सिडकोने अधिसूचित केली होती.
 
केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाच्या 2 जून 2020 च्या अधिसूचनेनुसार औषध निर्माण विभागाने औषध निर्माण उद्याने विकसीत करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासंदर्भातील योजनेनुसार रोहा व मुरुड तालुक्यातील 17 गावामधील एकूण 1994.969 हे.आर. क्षेत्रावर औषध निर्माण उद्यानाची स्थापना करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळामार्फत सिडको यांना हे क्षेत्र विनाअधिसूचित करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार सिडकोने हे क्षेत्र विनाअधिसूचित केले आहे.
 
महाराष्ट्र राज्यात मेगा रिफायनरी तथा पेट्रोकेमिकल प्रकल्पाकरिता राजापूर तालुक्यातील 14 गावांतील एकूण 5461.465 हे.आर क्षेत्र तसेच क्रूड ऑईल टर्मिनल आणि डि-सॅलिनेशन प्लांटसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये व रामेश्वर येथील एकूण 405.559 हे.आर. क्षेत्र दि. 18.5.2017 रोजी अधिसूचित करण्यात आले होते.
 
परंतु रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनास अधिसूचित केलेल्या जागेच्या भूसंपादनास भूधारकांच्या व तेथील संघटनेचा प्रचंड विरोध असल्याने तेथे मोजणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर हे संपूर्ण क्षेत्र 2.03.2019 रोजीच्या अधिसूचनेद्वारे विनाअधिसूचित करण्यात आले आहे.